लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यसायावर कारवाई; ११ महिलांची सुटका
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 23, 2024 11:55 PM2024-02-23T23:55:32+5:302024-02-23T23:55:45+5:30
ऑनलाईन मिळवले जात होते ग्राहक
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ऑनलाईन ग्राहक मिळवून लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिरवणे एमआयडीसी मधील राज ईन लॉजमध्ये हा प्रकार चालत होता. त्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सापळा रचून कारवाई केली आहे.
लोकॅन्टो या साईटवरून नवी मुंबईत ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार केले होते. या ग्राहकाने दलालाला ऑनलाईन संपर्क साधला असता त्याने ग्राहकाला महिलांचे फोटो पाठवले होते. त्यानंतर ग्राहकाला शिरवणे एमआयडीसी मधील राज ईन लॉजमध्ये बोलवण्यात आले होते.
काही वेळानंतर दलाल त्याठिकाणी महिलांना घेऊन आला होता. यावेळी लॉजबाहेर सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकला. त्यामध्ये दलालाने शिरवणे गावातील इमारतीमध्ये इतरही महिला लपवून ठेवल्या असल्याचे समोर आले. यामुळे त्याठिकाणी देखील छापा टाकला असून एकूण ११ महिला मिळून आल्या. दलालामार्फत त्यांना देहविक्री करायला लावली जात होती.
या महिलांची सुटका करून किशोर साव, सुरेंद्र यादव, साहिल मंडल व पुरुषोत्तम शेट्टी यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. के. लॉज हा दलालांमार्फत केवळ वेश्याव्यवसायाला वापरला जात होता. यामुळे तिथे येणाऱ्या ग्राहकांची नॉन देखील ठेवली जात नव्हती.