करावेतील मंदिरातून ११ किलो चांदी चोरीला

By Admin | Published: November 12, 2016 06:46 AM2016-11-12T06:46:01+5:302016-11-12T06:46:01+5:30

करावे येथील प्रसिद्ध गणेश मंदिरामध्ये शुक्रवारी पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून मंदिरातील ११ किलो चांदीची कमान, रिद्दी-सिद्धीची मूर्ती व दानपेटीतील सुटे पैसे वगळून

11 kg silver stolen from temple | करावेतील मंदिरातून ११ किलो चांदी चोरीला

करावेतील मंदिरातून ११ किलो चांदी चोरीला

googlenewsNext

नवी मुंबई : करावे येथील प्रसिद्ध गणेश मंदिरामध्ये शुक्रवारी पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून मंदिरातील ११ किलो चांदीची कमान, रिद्दी-सिद्धीची मूर्ती व दानपेटीतील सुटे पैसे वगळून इतर सर्व रक्कम चोरून नेली. तीन मिनिटांमध्ये चोरी करून चोरटे फरारी झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
नवी मुंबईमधील करावे गावामध्ये गावदेवी तलावाजवळ १९८२ मध्ये गणेश मंदिर उभारण्यात आले आहे. ग्रामस्थांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून गाभाऱ्यावर ११ किलो वजनाची चांदीची कमान बसविली होती. याशिवाय गणेश मूर्तीच्या बाजूला चांदीच्या रिद्दी व सिद्धीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा केली होती. शुक्रवारी पहाटे २ वाजून ३१ मिनिटांनी दोन चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. एकाने कटावणीने चांदीची कमान काढली तर दुसऱ्याने दानपेटीचे कुलुप तोडून त्यातील नोटा चोरल्या. विशेष म्हणजे, दानपेटीतील एक रुपया ते दहा रुपयांची नाणी तशीच ठेवली. मंदिरामध्ये २ वाजून ३१ मिनिटांनी आलेल्या चोरट्यांनी ११ किलो चांदीची मूर्ती घेऊन तीनच मिनिटांत तेथून पलायन केले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाली आहे.
चोरट्यांनी टीशर्ट व जिन्स घातली होती. चेहरा दिसू नये यासाठी स्कार्प लावले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून हाताच्या ठशांचे नमुनेही घेतले आहेत.
सकाळी दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याविषयी माहिती समजताच शेकडो ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. दिवसभर पोलीस पथकांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्हीचीही पाहणी करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी लवकर तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

Web Title: 11 kg silver stolen from temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.