- मयूर तांबडेपनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये नवीन मतदारांची नोंदणी प्रक्रि या सुरू झाली आहे. तब्बल नऊ हजारांहून अधिक नव्या मतदारांची नोंदणी झालेली आहे, तर दुबार, मयत, तिबार व स्थलांतरित असलेली ११ हजार नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना दिली.निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी आयोगाने नव मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वी पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ४९६ मतदानकेंद्राचा समावेश होता; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरी भागात एका यादी भागात एक हजार ४०० पेक्षा जास्त व ग्रामीण भागात एक हजार २०० पेक्षा जास्त मतदार संख्या असेल तर मतदान केंद्राचे विभाजन करण्यास आयोगाने कळविले आहे, त्यामुळे पनवेलमध्ये सद्यस्थितीत ५६३ मतदान केंद्रे झालेली आहेत. पनवेल विधानसभा मतदार संघात आतापर्यंत पाच लाख ११ हजार ८२९ एकूण मतदार संख्या झाली असून, दोन लाख ३७ हजार ५३८ स्त्री मतदार, तर दोन लाख ७४ हजार २९१ पुरु ष मतदार आहेत. यात छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या चार लाख ५८ हजार ३३९ आहे. तर छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या ५३ हजार ४९० आहे. तर कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या २३ हजार ५६ इतकी आहे. पाच लाखांपेक्षा जास्त मतदार संख्या असलेला पनवेल मतदार संघ हा इतर मतदार संघांपेक्षा जवळपास दुप्पट आहे.पनवेल विधानसभा मतदार संघातून दुबार व मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वर्षानुवर्षे वगळली न गेल्याने मतदारांची संख्या फुगली होती. पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तत्रेय नवले यांनी पालिकेच्या महासभेत जाऊन मतदार नोंदणीचा ठराव मांडला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली. नवीन मतदार नोंदणीसाठी बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पाहणी करत आहेत.जे मतदार घरी आढळले नाहीत किंवा ज्यांची नावे दुबार, मयत आहेत, ती नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नवले यांनी सांगितले. नावे प्रसिद्ध केल्यानंतर सात दिवसांच्या आत या मतदारांनी आपले म्हणणे कागदपत्रांसह मांडावे, अन्यथा मतदार यादीतून त्यांचे नाव रद्द केले जाणार आहे. त्यामुळे बोगस, दुबार, तिबार नाव व स्थलांतरित असलेली पनवेलमधील दुबार, मयत ११ हजार मतदारांची नावे कमी होणार आहेत.>तालुक्यातील नवीन मतदारांनी जास्तीत जास्त मतदान नोंदणी प्रक्रि येमध्ये सहभाग घ्यावा. मतदारांची छाननी सुरू असून दुबार नावे वगळण्यात येणार आहेत.- दत्तात्रेय नवले,प्रांताधिकारी, पनवेल
मतदारयादीमधील ११ हजार नावे कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:04 AM