हापूस विक्रीसाठी ११० पेट्या उपलब्ध
By admin | Published: February 7, 2017 05:24 AM2017-02-07T05:24:31+5:302017-02-07T05:25:33+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे. सोमवारी तब्बल ११० पेट्या आंबा विक्रीसाठी आला आहे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे. सोमवारी तब्बल ११० पेट्या आंबा विक्रीसाठी आला आहे. कोकण, केरळ व कर्नाटकमधून आवक सुरू झाली आहे.
फळांच्या राजाची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मार्केटमध्ये फेब्रुवारीच्या सुरवातीला होणाऱ्या आवकवरून पूर्ण हंगामाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. सुरवातीला कोणत्या विभागातून आंबा विक्रीला येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असते. या हंगामामध्ये ७ डिसेंबरलाच देवगड तालुक्यामधील कुणकेश्वर येथील प्रगतशील शेतकरी अरविंद वाळके यांना मुहूर्ताची पेटी पाठविली होती. तेव्हापासून काही प्रमाणात आंबा विक्रीला येत होता. ६ फेब्रुवारीला पहिल्यांदा ११० पेटी आंबा विक्रीला आला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधून हापूस व कर्नाटकसह केरळमधून हापूस, लालबाग, बदामी, तोतापुरी, गोळा हे आंबे विक्रीसाठी येत आहेत. ५ ते ७ डझनची पेटी ४ ते ७ हजार रुपये दराने विकली जात आहे. यावर्षी कोकणामध्ये आंबा पीक चांगले आले आहे. मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये आंबा उपलब्ध होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)