नवी मुंबई: खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी १५ ते २० लाख श्री उपस्थित राहणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असून त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई व कल्याण डोंबीवली परिवहन विभागाच्या तब्बल ११०० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सेंट्रल पार्कजवळील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क मैदान खारघर सेक्टर २८, २९ व ३१ येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण होणार आहे. आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्यामुळे तो सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून श्री सदस्य उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड मधील नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असणार आहे. कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन शासन व प्रशासनाच्या माध्यमातून जय्यत तयारी केली जात आहे. खासगी वाहनांची संख्या वाढून चक्काजामची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सार्वजनीक बसेसचा जास्तीत जास्त उपयोग केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी १८ लाख ३६ हजार नागरिकांची आसनव्यवस्था तयार केली आहे. कार्यक्रमास १५ ते २० लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून यामध्ये बस, रेल्वे व टॅक्सीतून जवळपास साडेआठ लाख नागरिक येण्याची शक्यता आहे.
बेस्ट प्रशासनाने या सोहळ्यासाठी सर्वाधीक ५०० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेनेही ३५० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या २०० व केडीएमसी च्या ५० बसेस या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त श्री सदस्य रेल्वे व बसने कार्यक्रम स्थळाकडे जातील याकडे लक्ष देण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ३५० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बसेसचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. - योगेश कडूस्कर, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका २६ हजार १७० खासगी बसेस व कारमहाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी देशभरातून २६१७० खासगी वाहने येतील असा अंदाज आहे. यामध्ये १६७८५ बसेस व ९३८५ कारचा समावेश असणार आहे. या सर्व वाहनांसाठी तीन पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. येथून येणार श्री सदस्यकोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, उत्तर प्रदेश, जव्हार, वाडा, पालघर, डहाणू, भिवंडी, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, मध्यप्रदेश मधून श्री सदस्य कार्यक्रमासाठी येणार आहेत.