शिल्लक ११०० घरांची लवकरच सोडत! सिडको जानेवारीत काढणार जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:35 AM2018-12-23T06:35:59+5:302018-12-23T06:36:31+5:30

घरांचा मागणी तसा पुरवठा करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडेच १५ हजार घरांची सोडत काढण्यात आली.

 1100 houses leaving soon! Advertising for CIDCO in January | शिल्लक ११०० घरांची लवकरच सोडत! सिडको जानेवारीत काढणार जाहिरात

शिल्लक ११०० घरांची लवकरच सोडत! सिडको जानेवारीत काढणार जाहिरात

Next

नवी मुंबई : घरांचा मागणी तसा पुरवठा करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडेच १५ हजार घरांची सोडत काढण्यात आली. प्रतिसादाअभावी यातील ११०० घरे शिल्लक राहिली आहेत. या शिल्लक घरांच्या विक्रीचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार या घरांसाठी जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
१५ हजार घरांच्या यशस्वी सोडतीनंतर सिडकोने आणखी ९० हजार घरांची योजना जाहीर केली आहे. या महागृहप्रकल्पाच्या प्रकल्पपूर्व कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. या घरांची निर्मिती होत असतानाच यापूर्वीच्या गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचाही निपटारा करण्याचा सिडकोचा हेतू आहे.
त्यानुसार आॅक्टोबर महिन्यात यशस्वीरीत्या सोडत काढल्यानंतर शिल्लक राहिलेली घरे तातडीने विकण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या योजनेत १४८३८ घरे होती. त्यापैकी १३७३८ घरे विकली गेली आहेत. उर्वरित ११०० घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
शिल्लक राहिलेली ही घरे विविध प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आरक्षित असलेली ही घरे शासनाच्या मान्यतेनंतर सर्वसामान्यासाठी खुली करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

‘त्या’ घरांचाही लवकरच निपटारा

सिडकोने आतापर्यंत सुमारे एक लाख ३० हजार घरांची निर्मिती केली आहे. यातील अनेक घरे विक्रीविना सिडकोकडे पडून आहेत. खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. विक्रीविना पडून असलेल्या घरांची संख्या जवळपास अडीच हजार इतकी आहे. तसेच यापूर्वी उभारण्यात आलेल्या अनेक गृहप्रकल्पांतील निवासी वा वाणिज्य मालमत्ता विक्रीविना पडून आहेत. येत्या काळात या मालमत्ताचाही निपटारा करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

Web Title:  1100 houses leaving soon! Advertising for CIDCO in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.