१११ कोटींची जेट्टी तयार, पण नेरुळ मुंबई जलवाहतुकीला मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:18 PM2023-09-15T12:18:31+5:302023-09-15T12:18:53+5:30

Navi Mumbai: नवी मुंबई ते मुंबईतील भाऊचा धक्कादरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. नेरुळ येथे साडेतीन हेक्टर क्षेत्रावर १११ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जेट्टीवरून ही जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

111 crore jetty is ready, but Nerul Mumbai water traffic does not get time | १११ कोटींची जेट्टी तयार, पण नेरुळ मुंबई जलवाहतुकीला मुहूर्त मिळेना

१११ कोटींची जेट्टी तयार, पण नेरुळ मुंबई जलवाहतुकीला मुहूर्त मिळेना

googlenewsNext

- नारायण जाधव
नवी मुंबई - नवी मुंबई ते मुंबईतील भाऊचा धक्कादरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. नेरुळ येथे साडेतीन हेक्टर क्षेत्रावर १११ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जेट्टीवरून ही जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे मेरिटाइम बाेर्डाने जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी डोळेझाक केली. अखेर सिडकोने दोन पाऊले पुढे टाकून जलवाहतूक सुरू करण्यासाठी भागीदार निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नेरुळची जेट्टी धूळ खात होती. तिच्या देखभालीवर सिडकोला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीए आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्यातून सिडकोने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यासाठी नेरूळ येथे जेट्टी बांधली आहे. एप्रिल २०१८ मध्ये तिच्या बांधकामास सुरुवात झाली. मात्र, कोरोनामुळे ते रखडलेेे होते. 
सिडकोने सप्टेंबर २०२१ मध्ये या जेट्टीचे काम पूर्ण केले. यासाठीचा संपूर्ण खर्च सिडकोने उचलला असला तरी मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मेरीटाइम बोर्डानेही प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करून निविदासुद्धा मागविल्या होत्या. शिवाय प्रस्तावित तिकीट दरसुद्धा जाहीर केले होते. मात्र, काहीच हालचाल झाली नाही. 
विशेष म्हणजे केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत या जेट्टीच्या बांधकामानंतर बेलापूर येथे नव्याने बांधलेल्या जेट्टीवरून १७ फेब्रुवारी २०२२ रोजी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. मात्र, याचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली,  जेट्टी तयार असूनही जलवाहतूक सुरू झालेली नाही. याबाबत टीका होऊ लागल्याने सिडकोने मेरीटाइम बोर्डाच्या नादी न लागता ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

३ वर्षांसाठी परवाना
जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी जो सिडको भागीदार निवडणार आहे, त्यास पहिल्या टप्प्यात तीन वर्षांकरिता जलवाहतूक टर्मिनलचे संचलन, देखभालीसह  व्यवस्थापनाचे काम देणार  आहे. यासाठी इच्छुक निविदाकारास सरकारी उपक्रम, प्रतिष्ठित खासगी एजन्सी अंतर्गत किमान तीन वर्षांचा जलवाहतूक सेवेचा, जलवाहतूक टर्मिनलचे संचलन, देखभालीसह व्यवस्थापनाचा अनुभव हवा. त्याच्याकडे जलवाहतुकीसह फेरी आणि रो रो सेवा किंवा हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन सेवेचा परवाना हवा.

Web Title: 111 crore jetty is ready, but Nerul Mumbai water traffic does not get time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.