सेवाकराची ११२ कोटींची थकबाकी

By admin | Published: March 31, 2017 06:44 AM2017-03-31T06:44:01+5:302017-03-31T06:44:01+5:30

सिडकोचा तब्बल ११२ कोटींचा सेवाकर थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी सिडकोने ८ डिसेंबर २0१६ रोजी अ‍ॅम्नेस्टी

112 crore for service tax | सेवाकराची ११२ कोटींची थकबाकी

सेवाकराची ११२ कोटींची थकबाकी

Next

नवी मुंबई : सिडकोचा तब्बल ११२ कोटींचा सेवाकर थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी सिडकोने ८ डिसेंबर २0१६ रोजी अ‍ॅम्नेस्टी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत सेवाकरांवरील विलंब करावर १00 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. ८ जून २0१७ रोजी ही योजना संपुष्टात येत असून मालमत्ताधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.
खारघर, कळंबोली, पनवेल, द्रोणागिरी आणि उलवे क्षेत्रात सिडकोच्या माध्यमातून विविध सेवा पुरविल्या जातात. यात रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणा, मलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे आदी सुविधांचा समावेश आहे. या सुविधांवरील खर्च सेवा आकाराच्या माध्यमातून नागरिकांकडून वसूल केला जातो. मालमत्तेच्या भाडेपट्टा करारामध्ये संबंधित मालमत्ताधारकांनी प्रत्येक आर्थिक वर्षाचा सेवा आकार १ एप्रिल रोजी आगाऊ भरावा, असे नमूद करण्यात आलेले आहे. असे असले तरी नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोच्या माध्यमातून या सेवाकरांच्या वसुलीसाठी प्रत्येक तीन महिन्यांनी देयके काढले जातात. परंतु त्यानंतरसुध्दा अनेकांनी हा कर भरला नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे.
सेवाकराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना दिलासा म्हणून अ‍ॅम्नेस्टी अर्थात अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर २0१६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली
होती.
या योजनेअंतर्गत थकबाकी असलेल्या एकूण सेवाकरावरील विलंब शुल्क शंभर टक्के माफ करण्यात आले आहे. सहा महिने कालावधीची ही योजना ८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्याअगोदर थकबाकी भरणाऱ्यांना विलंब शुल्कात शंभर टक्के सूट मिळणार आहे, तर त्यानंतर पुढील सहा महिने म्हणजेच ८ डिसेंबर २0१७ पर्यंत ५0 टक्के सूट असणार आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित कालावधीत या योजनेचा लाभ घेऊन आपला थकीत कर भरावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 112 crore for service tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.