मुंबईमध्ये कलिंगडची ११३६ टन विक्रमी आवक, बाजार समिती झाली कलिंगडमय

By नामदेव मोरे | Published: March 12, 2024 06:55 PM2024-03-12T18:55:54+5:302024-03-12T18:59:58+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ६९४ टन आवक झाली होती. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ११३६ टन आवक नोंद झाली आहे.

1136 tonnes record arrival of Kalingad in Mumbai, market committee becomes Kalingadmay | मुंबईमध्ये कलिंगडची ११३६ टन विक्रमी आवक, बाजार समिती झाली कलिंगडमय

मुंबईमध्ये कलिंगडची ११३६ टन विक्रमी आवक, बाजार समिती झाली कलिंगडमय

नवी मुंबई : रमजान व वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल ११३६ टन कलिंगडची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये १२ ते १८ रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री होत असून, पुढील तीन महिने आवक मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे.

रमजानच्या महिन्यात कलिंगडच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. यावर्षी उन्हाळ्यामध्येच उपवास सुरू झाल्यामुळे पहिल्याच दिवशी कलिंगडला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ६९४ टन आवक झाली होती. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ११३६ टन आवक नोंद झाली आहे. बाजार समितीच्या बाहेर दिवसभर ट्रक, टेम्पोची रांग लागली होती. संपूर्ण मार्केट कलिंगडमय झाले आहे. मार्च ते मेअखेरपर्यंत कलिंगडची आवक मोठ्या प्रमाणात होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. रमजानचा उपवास संपल्यानंतरही उन्हाळा असल्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला चांगली मागणी राहणार आहे.

मुंबई, नवी मुंबईमध्ये ग्राहकांकडून कलिंगडला पसंती मिळत असल्यामुळे राज्यातील सर्वात जास्त आवक मुंबई बाजार समितीमध्ये सुरू आहे. होलसेल बाजारात १२ ते १८ व किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

कोठून येते कलिंगड

मुंबई बाजार समितीमध्ये कर्नाटक, गुजरात, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर परिसरातून कलिंगडची आवक आहे. शुगर किंग, दीप्तीसह चार ते पाच प्रकारच्या कलिंगडच्या वाणांची आवक होत आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून व कर्नाटकमधूनही कलिंगडची आवक होत आहे. मुंबई, नवी मुंबईच्या स्थानिक मार्केटसह विदेशातही कलिंगडला मागणी असते. संपूर्ण उन्हाळा हंगाम सुरू राहील.
-शिवाजी चव्हाण, कलिंगड व्यापारी, एपीएमसी

यावर्षी उन्हाळा व रमजान सोबतच आहे. यामुळे आवक वाढली आहे. ग्राहकांचा प्रतिसादही उत्तम मिळत आहे. मेअखेरपर्यंत कलिंगडचा हंगाम सुरू राहील.
-संभाजी झांबरे, व्यापारी, एपीएमसी

राज्यातील कलिंगडची आवक व दर
बाजार समिती - आवक - बाजारभाव प्रतिकिलो
मुंबई - ११३६ टन - १२ ते १८
सोलापूर - ६१ टन - ५ ते १६
पुणे - १५१ टन - १० ते १५
पुणे, मोशी - ३९ टन - १० ते ११
भुसावळ - ८ क्विंटल - ६ ते १०

Web Title: 1136 tonnes record arrival of Kalingad in Mumbai, market committee becomes Kalingadmay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.