CoronaVirus News: जन्माष्टमीची ११८ वर्षांची परंपरा खंडित; कोरोनाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:05 AM2020-08-13T00:05:06+5:302020-08-13T00:05:43+5:30
ब्रिटिशांना न जुमानता घणसोलीत साजरा व्हायचा उत्सव
- अनंत पाटील
नवी मुंबई : स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असलेल्या घणसोली गावातील ११८ वर्षांपासून कृष्ण जन्माष्टमीचा अर्थात, दहीकाल्याच्या उत्सव अगदी अखंडितपणे साजरा केला जातोय, परंतु या वर्षी कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. ग्रामस्थांनी अगदी साध्या व तितक्याच सुरक्षित पद्धतीने आठ-दहा लोकांच्या उपस्थितीत या वर्षी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला. गावकीचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी मानाची हंडी फोडून पारंपरिक उत्सवाचा सोपस्कार पूर्ण केला.
खारी-कळवे बेलापूर पट्टीत १९३० ते १९३२ कालावधीत मिठाचा सत्याग्रह झाला होता. या सत्याग्रहात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी सहभाग घेतला होता. याच वेळी अनेक नेत्यांनी घणसोली गावातील छावणीला भेट दिली होती, तर अनेक स्वातंत्र्य सैनिक ब्रिटाशांना हुलकावणी देण्यासाठी घणसोली गावाचा आश्रय घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर घणसोली गावाला एक ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली आहे. इंग्रजांचा विरोध असतानाही या गावात शिनवार कमळ्या पाटील यांनी सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू केला. १९०२ साली घणसोली गावात शिनवार कमळ्या पाटील यांनी राहत्या घरी गोकुळाष्टमीच्या उत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर, काही वर्षांनी हा उत्सव घणसोली गावकीच्या हनुमान मंदिरात होऊ लागला. या ऐतिहासिक परंपरेला या वर्षी ११८ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिनवार कमळ्या पाटील यांच्या चौथ्या पिढीने ही परंपरा अबाधित ठेवली आहे, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी या ऐतिहासिक परंपरेला ब्रेक लागला आहे. ग्रामस्थांनीही सरकारच्या आदेशानुसार या वर्षी अगदी साध्या पद्धतीने दहीकाल्याचा उत्सव साजरा केला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता केवळ चार ते पाच जणांच्या उपस्थितीत मंदिरातच केवळ सहा फुट उंचीवर लावण्यात आलेली दहीहंडी फोडली. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी मंडळीनी अभंग गात छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ या धार्मिक उत्सवाचा समारोप केला. यावेळी गावकीचे अध्यक्ष चेतन पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, बाबुराब बुवा पाटील, एकनाथ रानकर, दिनानाथ पाटील, यशवंत पाटील आदी उपस्थित होते.
नवी मुंबईतील नावाजलेले ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाने यंदाच्या वर्षी एका अनोख्या उपक्रमासोबत दहीहंडी साजरी केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करता, या गोविंदा पथकाने ऐरोली कोळीवाडा परिसरातील सर्व कुटुंबीयांच्या सुरक्षेचा विचार करून घरोघरी कोरोना किटचे वाटप करून, अनोख्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला.