नवी मुंबई : ऐरोली येथे पालिकेने बांधलेल्या मंगलकार्यालयाच्या उद्घाटनावेळी शुक्रवारी झालेल्या राड्याप्रकरणी, राष्ट्रवादी-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूकडील एकूण १२ जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरील व्हिडीओ चित्रफीत तपासून राड्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.कार्यकर्त्यांच्या झटापटीत राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या कारची तोडफोड करून त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी नाईक यांनी नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी व विनया मढवी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. तर मढवी यांनी संदीप नाईक, अनंत सुतार आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यां- विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शनिवारी दिवसभर राष्ट्रवादीच्या सात, तर सेनेच्या पाच जणांना अटक केली आहे.शनिवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झालेल्या कोणत्याही महत्त्वाच्या पदाधिकाºयाला अटक झालेली नाही. पुरावे गोळा करून या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.कार्यक्रमाचे चित्रीकरण केलेल्या व्हिडीओग्राफरकडून ते तपासले जात आहे. ज्यांच्याकडे घटनास्थळावरील व्हिडीओ आहेत, त्यांनी ते पोलिसांना द्यावे, असे आवाहन परिमंडळ १ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी केले आहे.>धनंजय मुंडेंनी घेतली आयुक्तांची भेटविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकावर दाखल गुन्ह्यातील ३०७ व ३५३ ही दोन कलमे वगळण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपींवर कारवाई झाली नाही, तर लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
ऐरोली राड्याप्रकरणी १२ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 3:29 AM