पनवेल : पनवेल महापालिका स्थायी समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत १२ विषयांना मंजुरी देण्यात आली. या १२ विषयांपैकी घनकचरा व्यवस्थापनाच्या हस्तांतरणाच्या ठरावाबाबत सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी हा विषय मतास टाकल्याने ९ विरुद्ध ६ अशा मताने या ठरवाला मंजुरी देण्यात आली.
१२ विषयामध्ये घनकचरा व्यवस्थापन सिडको प्रशासनाच्या मंजूर कंत्राटदाराकडून सिडकोच्या मंजूर दराने करून घेण्यास मंजुरी मिळणे, पनवेल महानगर पालिकेकरिता टाटा कंपनीचे ५ टेम्पो खरेदी करणे, पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणचे डेब्रिज उचलणे याकरिता आलेल्या निविदाबाबत निर्णय घेणे, घनकचरा संकलन व वाहतूक करणेकामी ३ टन क्षमतेच्या २५ घंटागाड्या जीइएम पोर्टलवरून खरेदी करणे करण्याकरिता निविदेला मान्यता देणे, घनकचरा संकलनासाठी १४ कॉम्पॅक्टर खरेदीसाठी जीइएन पोर्टलवरून खरेदी करणे, पालिका क्षेतातील नालेसफाई, घनकचरा गोळा करणे, वाहतूक करणे याकरिता मनुष्यबळ पुरविण्यासाठी निविदा मागविणे, शहराच्या सिटी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी आलेल्या निविदाबाबत निर्णय घेणे आदी महत्वाच्या विषयासह मागील सभेत स्थगित असलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन अंतर्गत सीएसआर फंडातून २० इ टॉयलेट खरेदीकामे जीईएम पोर्टलवर प्राप्त झालेल्या निविदांना मंजुरी देण्यात आली.घनकचरा व्यवस्थापनाच्या एकाच विषयावर या बैठकीत गोंधळ झाला. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पालिकेने टप्प्याटप्याने स्वीकारावी अशा सूचना विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली. नगरसेवक हरेश केणी यांनी देखील घनकचरा व्यवस्थापनातील कामगारांच्या पगाराचा मुद्दा यावेळी उपस्थित केला. कंत्राटदाराकडून या कामगारांना दिल्या जाणाºया वेतनामध्ये तफावत असल्यास पालिकेसमोर पेच निर्माण होईल. घनकचरा व्यवस्थापनात सुरुवातीचे दोन महिने सिडकोने नियुक्त केलेलाच कंत्राटदार कचरा उचलणार आहे. त्यानंतर पालिका ठेकेदार नेमणार आहे.