पनवेल शहरात १२ अनधिकृत धार्मिक स्थळे
By admin | Published: January 19, 2016 02:24 AM2016-01-19T02:24:56+5:302016-01-19T02:24:56+5:30
न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पनवेल नगरपालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये एकूण १२ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याची
पनवेल : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पनवेल नगरपालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये एकूण १२ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याची माहिती उजेडात आली आहे. ही धार्मिक स्थळे अन्यत्र हलविण्याबाबत त्यांच्या विश्वस्तांबरोबर चर्चा सुरू असल्याचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पनवेल शहरात अनेक जातीधर्मांचे लोक राहतात. रहिवासी संकुले अथवा परिसरातील राखीव मोकळ्या भूखंडावर धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. काही भूखंडे रहदारीस अडथळे निर्माण करीत आहेत. मात्र संवदेनशील बाब म्हणून पालिका प्रशासनाकडून या धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांकडूनही या स्थळांना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत आहे.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने, अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे, नियमित करणे; त्याचबरोबर स्थलांतरित करण्याचे निर्देश शासनाला दिले आहे. त्यानुसार राज्य शासनाने धोरण निश्चित करून अनधिकृत धार्मिक स्थळांचा आढावा घेण्याचे आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिले. त्यानुसार पनवेल नगरपालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा सर्व्हे केला आहे. याविषयी कार्यवाही करण्यासंदर्भातील विषय सभागृहासमोर प्रशासनाने ठेवला होता. गतवर्षी काही धार्मिक स्थळे नियमित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. ज्या धार्मिक स्थळांचे स्थलांतर करायचे आहे, त्याकरिता संबंधित व्यक्ती, संस्थांची बैठक घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)