१२ वर्षीय मुलीचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू, डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 07:31 AM2024-08-24T07:31:20+5:302024-08-24T07:31:28+5:30
पाच दिवसांपूर्वी ताप आल्याने तिला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते.
नवी मुंबई : डेंग्यूसदृश आजाराने नेरूळमधील १२ वर्षीय मुलीच्या मृत्यूची घटना शुक्रवारी घडली. पाच दिवसांपासून तिच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मेंदूशी संबंधित आजाराने तिचा मृत्यू झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पलक जाखवाडिया असे मृत मुलीचे नाव आहे. ती पालिकेच्या शाळेत सहावीत शिकत होती. पाच दिवसांपूर्वी ताप आल्याने तिला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते.
यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल केले होते. अखेर शुक्रवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तिचा मृत्यू मेंदूशी संबंधित त्रासाने झाला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; परंतु पलक राहत असलेल्या बांचोली मैदान परिसरात मागील महिन्याभरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पलक हिलाही डेंग्यू झाला होता. मात्र आरोग्य विभागाचे अपयश झाकण्यासाठी ही बाब दडपली जात असल्याचा आरोप मनसे उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणारी वास्तू अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहत असल्याने परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचाही आरोप म्हात्रे यांनी केला. तीसहून अधिक वर्षे पडीक अवस्थेत असलेल्या या वास्तूत मोठ्या प्रमाणात घाण, पाणी साचली असून त्या ठिकाणी धुरीकरण, फवारणीदेखील होत नाही. तक्रार करूनही ही वास्तू जमीनदोस्त केली जात नसल्याने ते ठिकाण डासउत्पत्तीचे केंद्र बनत आहे.