जेएनपीटीच्या माध्यमातून उरणमध्ये १२० खाटांचे कोविड केअर सेंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:49 PM2020-06-06T23:49:12+5:302020-06-06T23:49:34+5:30
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची सुरुवात झाल्यापासूनच कोविड-१९ सेंटर उभारावे, अशी मागणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जेएनपीटीकडे केली होती
उरण : रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्रशासनाने उरणकरांंसाठी कोरोनाबाधित रुग्णांवर उरणमध्येच उपचार करण्यासाठी १२० बेडच्या सुसज्ज कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. यामुळे उरणमधील रुग्णांना उपचारासाठी उरणबाहेर जाण्याची चिंता मिटली आहे.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची सुरुवात झाल्यापासूनच कोविड-१९ सेंटर उभारावे, अशी मागणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जेएनपीटीकडे केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले, अश्विनी पाटील, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केला होता. अखेर जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनीही प्रशासनाच्या मागणीची दखल घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीस जेएनपीटीने बोकडविरा-उरण येथील बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्राला १२० बेड आणि रुग्णवाहिका सेवेसह कोविड केअर सेंटरची उभारणी झाली.
उरणमधील कोरोना रुग्ण व त्यांच्या संरक्षणासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेले कोविड सेंटर जेएनपीटीने उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्यामार्फत नुकतेच राज्य सरकारच्या स्वाधीन केले आहे. जेएनपीटीने बोकडविरा येथील बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्र कोविड केअर सेंटर म्हणून राज्य सरकारच्या ताब्यात देऊन या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी स्थानिक समुदायाची तयारी वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोविड-१९ विरुद्ध सर्व मिळून हा लढा निश्चितपणे जिंकू, अशी प्रतिक्रिया जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली आहे. जेएनपीटीने उभारलेल्या कोविड सेंटरचा लाभ रुग्णांना होणार असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी दिली. या सेंटरमुळे उरण परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.