महारोजगार मेळाव्यात १२०० उमेदवारांना लागली लॉटरी; ३००पेक्षा अधिक युवकांची स्टार्टअपसाठी नोंदणी
By कमलाकर कांबळे | Published: January 13, 2024 07:23 PM2024-01-13T19:23:14+5:302024-01-13T19:23:27+5:30
पाच स्टार्टअप उद्योगांचा या मेळाव्यात शुभारंभ करण्यात आला.
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित महारोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात ४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी १२०० उमेदवारांना थेट नोकरीची संधी प्राप्त झाली. मेळाव्यात तीनशेपेक्षा अधिक युवकांनी स्टार्टअपसाठी नोंदणी करून उद्योग सुरू करण्यासंदर्भात प्राथमिक माहिती घेतली. पाच स्टार्टअप उद्योगांचा या मेळाव्यात शुभारंभ करण्यात आला.
माजी खासदार संजीव नाईक यांच्या पुढाकाराने तथा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यासाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष आमंत्रित म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार उपस्थित होते.
मंत्री कपील पाटील यांनी संजीव नाईक यांच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याचे कौतुक केले. विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्याचा संकल्प स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगाने लक्षावधी नोकरीच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन तरुणांनी स्वत:ला तयार ठेवावे, असे आवाहन गणेश नाईक यांनी केले. मेळाव्यात रोजगार प्राप्त झालेल्या उमेदवारांना या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.