एक हजार जागांसाठी १२ हजार अर्ज, भरतीसाठी राज्यातील तरुण पनवेलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 05:53 AM2019-12-06T05:53:05+5:302019-12-06T05:54:51+5:30

रायगड सुरक्षा मंडळाची भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी रोडपाली येथील पोलीस मुख्यालयात सुरू आहे. या प्रक्रियेसाठी राज्यभरातील उमेदवार पनवेलमध्ये आले होते.

12000 applications for 1000 seats in the youth panvel in the state | एक हजार जागांसाठी १२ हजार अर्ज, भरतीसाठी राज्यातील तरुण पनवेलमध्ये

एक हजार जागांसाठी १२ हजार अर्ज, भरतीसाठी राज्यातील तरुण पनवेलमध्ये

Next

- वैभव गायकर

पनवेल : रायगड सुरक्षा मंडळाची भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी रोडपाली येथील पोलीस मुख्यालयात सुरू आहे. या प्रक्रियेसाठी राज्यभरातील उमेदवार पनवेलमध्ये आले होते. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सुरक्षा मंडळाच्या भरतीसाठी तरुणांमध्ये चढाओढ सुरू आहे.
राज्यातील सातारा, सांगली, जळगाव, कराड, पुणे, नाशिक आदी ठिकाणांहून तरुण-तरुणी या भरतीसाठी पनवेलमध्ये दाखल झाले होते. डिसेंबर २ ते ११ दरम्यान ही रायगड सुरक्षा मंडळाच्या भरतीपूर्व परीक्षा चालणार आहे. १००० जागांसाठी शारीरिक चाचणी सुरू असून, त्याकरिता रायगड सुरक्षा महामंडळाकडे सुमारे १२ हजार अर्ज केले होते. त्यापैकी ६५०० अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी केवळ एक हजार जणांची निवड केली जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड येथून आलेल्या संतोष जाधव या उमेदवाराची शारीरिक चाचणी गुरुवारी झाली. पाच वर्षांपासून तो नोकरीच्या शोधात असून पोलीस, सैनिक भरतीमध्येही त्याने सहभाग नोंदवला होता. मात्र, निवड झाली नाही. कळंबोलीतील नातेवाइकाकडे तो थांबला आहे. त्याने शारीरिक चाचणी यशस्वीपणे पार केली आहे. मात्र, आॅनलाइन पद्धतीने भरती केली जाणार असल्याने निकाल उशिराच कळणार असल्याचे तो सांगतो.
भविष्यात पनवेल शहराची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे विविध आस्थापनांना रायगड सुरक्षा मंडळाच्या वतीने त्यांना सुरक्षारक्षक पुरविणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी पुणे येथील तरुणदेखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते. किशोर केदारे हा तरुण पुण्याहून भरती प्रक्रियेसाठी आला होता. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणारा किशोर भेटेल ती नोकरी करण्याच्या तयारीत आहे.
सूरज फडके हा बोनशेतचा रहिवासी असून, स्थानिक तरुणांपेक्षा बाहेरगावांहून आलेल्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक तरुणांकडे निवासाची व्यवस्था नसताना बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावरच त्यांनी आश्रय घेतला.

भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील तरुणांची संख्या अधिक आहे. ११ डिसेंबरपर्यंत शारीरिक चाचणी होणार असून, अद्याप उमेदवारांचा ओघ सुरूच आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही चाचणी सुरू आहे. केवळ एक हजार जागा रायगड सुरक्षा मंडळ भरणार असल्याने उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा आहे.
- आनंद भोसले,
अध्यक्ष,
रायगड सुरक्षा मंडळ

Web Title: 12000 applications for 1000 seats in the youth panvel in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल