नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी १२३ कोटी, नवी मुंबई पालिकेकडून ९६ ठेकेदारांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 02:47 AM2020-01-20T02:47:43+5:302020-01-20T02:48:05+5:30
सद्य:स्थितीमध्ये रस्ते सफाई व पावसाळापूर्व गटार सफाईचे काम ९१ ठेकेदारांकडून करून घेतले जात आहे. या ठेकेदारांच्या कामाची मुदत मार्च २०२० मध्ये संपत आहे. यामुळे नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील साफसफाई व पावसाळापूर्व गटार सफाईसाठी आठ ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत मांडला होता. या प्रस्तावामध्ये सुधारणा करून ९६ ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १२२ कोटी ९६ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. राज्य शासनाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर नवी मुंबईला प्रथम क्रमांक मिळाला होता. केंद्र शासनाने सुरू केलेल्या अभियानामध्येही महापालिकेने ठसा उमटविला असून यामध्ये साफसफाई कामगारांचा मोठा वाटा आहे. सद्य:स्थितीमध्ये रस्ते सफाई व पावसाळापूर्व गटार सफाईचे काम ९१ ठेकेदारांकडून करून घेतले जात आहे. या ठेकेदारांच्या कामाची मुदत मार्च २०२० मध्ये संपत आहे. यामुळे नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
शहरातील १३ लाख ३६ हजार मीटर रस्त्यांची साफसफाई केली जात असून ४ लाख ४१ हजार लांबीच्या गटारांची सफाई केली जाते. पूर्वीप्रमाणे ९१ ठेकेदारांऐवजी विभाग कार्यालयनिहाय ८ ठेकेदारांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. कामामध्ये एकसूत्रीपणा यावा व प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यात सुलभ व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. सिडको विकसित नोड, गावठाण, रेल्वे स्टेशन, मार्केट परिसरातील साफसफाईसाठी सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत काम करणे अपेक्षित आहे. सकाळी रस्ते सफाईसाठी १९५८ बीट व गटार सफाईसाठी ७४४ बीट तयार केले होते. दुपारच्या सत्रासाठी २६४ बीट तयार केले होते.
प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावामुळे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या कामावर गंडांतर येणार होते. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रकल्पग्रस्त ठेकेदार साफसफाईचे काम करत आहेत. महापालिकेला अडचणीच्या काळातही या सर्वांनी सहकार्य केले आहे. कोल्हापूर व सांगलीमधील पूरपरिस्थितीमध्येही येथील ठेकेदार व कामगारांनी उत्तम काम केले होते. फक्त ८ ठेकेदारांच्या नियुक्तीमुळे या सर्वांवर अन्याय झाला असता.
याशिवाय फक्त आठ ठेकेदार असल्यामुळे एखाद्या ठेकेदाराने व्यवस्थित काम केले नाही तर त्याचा फटका पूर्ण विभाग कार्यालय क्षेत्रावर पडला असता. यामुळे महापालिकेने प्रशासनाच्या प्रस्तावामध्ये सुधारणा सुचविली आहे. ८ ऐवजी ९६ ठेकेदारांच्या माध्यमातून साफसफाईचे काम करण्याची दुरुस्ती सूचवून हा प्रस्ताव मंजूर केला आहे. एक वर्षासाठी १२२ कोटी ९६ लाख ६२ हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे.
मुदतवाढ द्यावी लागणार
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये फेब्रुवारी २०१३ मध्ये ९१ ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या ठेकेदारांच्या कामाची मुदत मार्चमध्ये संपणार आहे. महापालिकेने नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मंजुरी घेतली आहे. निविदा प्रक्रिया सुरू केली तरी मार्च अखेरपर्यंत नवीन ठेकेदारांची नियुक्ती करणे शक्य होणार नाही. यामुळे आहेत त्या ठेकेदारांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे.
प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना दिलासा
महापालिकेने प्रशासकीय विभागनिहाय फक्त आठ ठेकेदारांची नियुक्ती केली असती तर प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय झाला असता. हक्काचे कामही त्यांच्या हातातून निघून गेले असते. महापालिकेने पूर्वीच्या ९१ ऐवजी ९६ गट तयार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना दिलासा मिळाला आहे.
तुर्भे कचराभूमीवर पालिकेचा सातवा सेल
नवी मुंबई : तुर्भे कचराभूमीच्या जागेवरील सहावा सेल महापालिका लवकरच बंद करणार आहे. ४० हजार चौरस मीटरवर नवीन सेल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी २० कोटी २४ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी मुंबई पालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. यापूर्वी कोपरखैरणेतील जुन्या कचराभूमीच्या जागेवर निसर्ग उद्यान उभारण्यात आले आहे. २००५ पासून तुर्भेमधील ६५ एकर जमिनीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने या जमिनीचा वापर करण्यात आला. एकूण सहा सेल तयार करण्यात आले होते. यापैकी चार सेल शास्त्रोक्त पद्धतीने बंद केले आहेत. पाचवा सेल बंद करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सहावा सेल सद्य:स्थितीमध्ये कार्यरत असून त्याची क्षमता कमी होत आली आहे. लवकरच त्याची क्षमता पूर्णपणे संपुष्टात येणार असल्यामुळे सातवा सेल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका तुर्भेमध्येच ४० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर नवीन सेल तयार करणार आहे. संपूर्ण सेलमध्ये जिओसिंथेटिक क्लाय लायनर टाकला जाणार आहे. त्यामध्ये एचडीपीई लायनरसह जिओटेक्सटाईल पुरवावी लागणार आहे. ३५५ मि.मी. व्यासाचे ४०० मीटर व १६० मि.मी. व्यासाचे २६०० मीटर एचडीपीई पाइप पुरवावे लागणार आहेत. सेलमध्ये ३० मि.मी.ची खडी, ८ हजार चौरस मीटरचे स्टोन पिचिंग करण्यात येणार आहे. या कामासाठी २० कोटी २४ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली असून प्रत्यक्षात सेल तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सहाव्या सेलची क्षमता जवळपास संपली असून कच-यामुळे तुर्भे स्टोअर्स परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. सहावा सेल बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनीही याविषयी वारंवार सभागृहात आवाज उठविला होता. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ प्रस्ताव तयार करून त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली आहे.