सिडकोच्या घरांसाठी १,२३४ पोलिसांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:51 AM2020-08-09T00:51:51+5:302020-08-09T00:52:01+5:30
अर्ज सादर करण्याची २९ ऑगस्ट अंतिम मुदत
नवी मुंबई : सिडकोने खास पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला पोलिसांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा दिवसांत या गृहप्रकल्पासाठी १,२३४ पोलिसांनी सिडकोच्या वेबपोर्टलवर नोंदणी केली आहे. यापैकी ७६७ पोलिसांनी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत.
मुंबई प्रादेशिक क्षेत्रात काम करणाऱ्या पोलिसांसाठी सिडकोने २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या विशेष गृहयोजनेचा शुभारंभ केला आहे. यात ४,४६६ घरांचा समावेश आहे. २८ जुलैपासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू करण्यात आली असून, २९ आॅगस्टपर्यंत घरांच्या नोंदणीसाठी पोर्टल खुले राहणार आहे. त्यानंतर, १५ सप्टेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, मागील दहा दिवसांत या पोर्टला तब्बल २,७११ पोलिसांनी भेट दिली आहे. त्यापैकी शनिवारी सांयकाळपर्यंत १२३४ पोलिसांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असून ७६७ जणांनी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी आणखी २0 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत आणखी अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास सिडकोच्या संबधित विभागाने व्यक्त केला आहे.
याच गृहप्रकल्पात ४,४६६ घरे खास पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यापैकी १,0५७ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित ३,४0९ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना विविध करणांमुळे गृहस्वप्नाची पुर्तता करता येत नाही. परंतु सिडकोने त्यांना ही संधी उपलब्ध केली आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी येथे महागृहप्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.
मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर घरांची निर्मित्ती करण्याच्या निर्णयानुसार सिडकोने विविध घटकांसाठी २ लाख १0 हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ९0 हजार घरांचे कामही सुरू करण्यात आले आहे.
तत्पूर्वी २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना पुढील दीड दोन महिन्यांत घरांचे प्रत्यक्ष वाटप करण्याची तयारी सिडकोने सुरू केली आहे.