नवी मुंबई : राज्यातील रक्ताचा तुटडा भरून काढण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पाच मार्केटमधील व्यापारी, माथाडी कामगार, सुरक्षारक्षकांनीही या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. दिवसभरात तब्बल १,२५१ बाटल्या रक्त संकलित झाले असून, रक्तपेढ्यांची क्षमता पूर्ण झाल्यामुळे सायंकाळी शिबिर थांबवावे लागले.मार्चपासून सतत ९ महिने नियमित रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून, राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रक्तदानाचे आवाहन केले आहे. राज्यातील रक्ताची गरज रक्षात घेऊन मुंबई बाजार समितीने शनिवारी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. प्रत्येक नैसर्गिक संकट व राष्ट्रीय आपत्तीमध्ये बाजार समितीमधील माथाडी व व्यापारी मदतीचा हात पुढे करत असतात. रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर पाचही मार्केटमध्ये सकाळीपासून रांगा लागल्या होत्या.बाजार समितीचे संचालक आमदार शशिकांत शिंदे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक संजय पानसरे, शंकर पिंगळे, विजय भुत्ता, नीलेश वीरा, अशोक वाळुंज, सचिव अनिल चव्हाण, अतिरक्त सचीव संदीप देशमुख यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. ३५२ रक्तदात्यांना हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे व इतर कारणांमुळे इच्छा असूनही रक्त देता आले नाही. नवी मुंबई महानगरपालिका व खासगी रक्तपेढ्यांची रक्त साठविण्याची क्षमता पूर्ण झाल्यामुळे सायंकाळी ५ वाजता शिबिर थांबविण्यात आले. रक्तदान करू इच्छिणाऱ्यांची यादी तयार करून आवश्यकतेप्रमाणे रक्त देण्यात येणार आहे.मुंबई बाजार समितीमधील माथाडी कामगार, व्यापारी व सर्वच घटक नैसर्गिक संकट व राष्ट्रीय आपत्तीमध्ये मदतीसाठी पुढे येत असतात. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रक्तदानाचे आवाहन करताच, सर्वांनी उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभागी होऊन विक्रमी १,२५१ बाटल्या रक्ताचे संकलन केले आहे.- शशिकांत शिंदे, संचालक, मुंबई बाजार समिती
बाजार समितीमध्ये १,२५१ बाटल्या रक्तसंकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 1:22 AM