राज्याच्या १३ जिल्ह्यांचा विकास होणार सुसाट; साडेतीन तासांत मुंबईहून नागपूर प्रवास शक्य
By नारायण जाधव | Published: September 6, 2023 08:05 PM2023-09-06T20:05:59+5:302023-09-06T20:06:14+5:30
मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे.
नवी मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. या मार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे राज्यांतर्गत हा पहिलाच बुलेट प्रकल्प असून, तो समद्धी महामार्गाला समांतर असा राहणार आहे.
या बुलेट प्रकल्पाच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार या मार्गाची लांबी ७६६ किलोमीटर आहे. हा मार्ग ६८ टक्के समृद्धी महामार्गाला समांतर असा असल्याने त्यासाठी आवश्यक जमीनदेखील कमी लागणार आहे. या प्रकल्पाकरिता १२६० हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. तो राज्यातील अकरा जिल्ह्यांमधून जाणारा असून, याव्यतिरिक्त इतर १३ जिल्ह्यांना त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.
ही आहेत प्रस्तावित १३ बुलेट ट्रेन स्थानके
या बुलेट ट्रेन मार्गावर १३ स्टेशन प्रस्तावित आहेत. यामध्ये मुंबई, शहापूर, इगतपुरी नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव जहाँगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या शहरांचा यामध्ये समावेश आहे.
नऊ ते दहा तास वेळ वाचणार
सध्या जर आपण नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ पाहिला तर तो बारा ते पंधरा तास इतका लागतो; परंतु हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये हे अंतर पूर्ण करता येणार आहे. बुलेट ट्रेनचा ताशी वेग ३५९ किलोमीटर असणार असून, प्रत्यक्षात २५० किलोमीटर प्रतितासाचा वेग आपल्याला मिळेल, असा अंदाज आहे.
प्रतिकिमी २३२ कोटी रुपये खर्चाचा अंदाज
प्रकल्पाकरिता लागणारा खर्च हा एका किलोमीटरकरिता २३२ कोटी रुपये इतका येईल, असा अंदाज असून, त्यानुसार एकूण एक लाख ७० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा
मुंबई-नागपूर प्रकल्पाचा प्रस्ताव २०१९ मध्ये तयार करून २०२१ मध्ये त्याचा हवाई लीडार सर्वेक्षणदेखील केले होते. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ पसून या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्याला सुरुवात झाली. त्यानंतर तो मार्च २०२२ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर केला होता. तो बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करता येणार आहे.
हे आहेत प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्ग
१ दिल्ली-वाराणसी (८६५ किमी)
२. मुंबई-नागपूर (७५३ किमी)
३. दिल्ली-अहमदाबाद (८८६ किमी)
४. चेन्नई-म्हैसूर (४३५ किमी)
५. दिल्ली-अमृतसर (४५९ किमी)
६. मुंबई-हैदराबाद (७११ किमी)
७. वाराणसी-हावडा (७६० किमी)
(कॉरिडोरची उल्लेखित लांबी ही अंदाजित असून, प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर ती बदलू शकते.)
मुंबई-हैदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील नियोजित स्थानके
यातील मुंबई-हैदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद व हैद्राबाद अशा दहा स्थानकांचा समावेश असून, महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यांतून ती धावणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ९ किमीचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील मोठी जमीन होणार बाधित
ठाण्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन तीत जाणार आहे. तर मुंबई-नागपूर मार्गात नाशिकच्या पुढे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून ती न्यावी की नाही, यावरून राज्यकर्त्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांत अजूनही मतभेद आहेत; तसेच ठाणे जिल्ह्यातील उपरोक्त गावांव्यतिरिक्त कल्याणपुढील नाशिकपर्यंतची अनेक गावांची जमीन मुंबई-नागपूर मार्गात बाधित होणार आहे.
हे अडथळे पार करावे लागणार
मोठ्याप्रमाणात शेतजमिनीसह वनजमीन बाधित होणार आहे. त्यामुळे डीपीआरनंतर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली तरी सीआरझेड आणि वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आणि भूसंपादनाचे अडथळे पार करावे लागणार आहेत.