पनवेलमध्ये खोदल्या १३ विंधण विहिरी
By admin | Published: June 23, 2017 06:06 AM2017-06-23T06:06:34+5:302017-06-23T06:06:34+5:30
पनवेल तालुक्यातील गावांत विंधण विहिरी खोदण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत एकूण १३ विंधण विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल तालुक्यातील गावांत विंधण विहिरी खोदण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत एकूण १३ विंधण विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत. यातील ९ विहिरींना पाणी लागले आहे, तर ४ विहिरींचे खोदकाम अयशस्वी ठरले आहे. २ विंधण विहिरी रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून १५ गावे, तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यातील ४ गावे आणि १४ वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यास परवानगी मिळाली होती. यापैकी १३ विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत. नानोशी, पाटनोली, मोसारे, मानघर, ताडाचा टेप, हाल्टेप, तुराडे ठाकूरवाडी, तुराडे वाडी, गुळसुंदे वाडी, बोंडारपाडा, भेरले कातकरवाडी, नानोशी-माळमोसारे, नानोशी-कातकरवाडी या १३ गावांमध्ये विंधण विहिरी खोदण्यात आल्या. यापैकी माणघर, पाटनोली, नानोशी, हाल्टेप येथील विंधण विहिरींना पाणी लागले नाही. तर मोसारे, बोंडारपाडा, भेरले कातकरवाडी, नानोशी-कातकरवाडी, नानोशी-माळमोसारे, गुळसुंदे आदिवासीवाडी, तुराडे आदिवासीवाडी, तुराडे ठाकूरवाडी, ताडाचा टेप येथील विंधण विहिरींना पाणी लागले आहे. पोयंजे कातकरवाडी, पाली कातकरवाडी, कोंडले येथील विंधण विहिरींचे कामकाज अपूर्ण आहे. तर सांगुर्ली येथील फणसवाडी व माल्डुंगे येथील चिंचवाडी या गावांमध्ये बोअरवेलची गाडी जाण्यास रस्ता नसल्यामुळे विंधण विहिरी खोदण्यास आलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या विंधण विहिरी रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. डी. चव्हाण यांनी दिली.