नवी मुंबई : शहरात बेवारस मृतदेह आढळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यापैकी बहुतांश व्यक्ती बेघर असल्याने पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर देखील त्यांची ओळख पटत नाही. चालू वर्षात नऊ महिन्यात नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात १३४ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. तर गतवर्षी १५९ बेवारस मृतदेह आढळून आले होते.
नवी मुंबईत घडणारे गुन्हे उघडकीस आणणे, हैदोस घालणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश लावणे याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांपुढे आहे. त्यातच बेवारस मृतदेहांच्या तपासाची भर पडत आहे. अनेकदा बेवारसपणे आढळून येणाऱ्या मृतदेहांमागे गुन्हेगारी कृत्यांचा देखील संदर्भ असू शकतो. त्यामुळे प्रत्येक बेवारस मृतदेहाचा तपास पोलिसांकडून गांभीर्याने केला जातो. त्यात नैसर्गिक किंवा अपघाती मृत पावणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. परंतु नवी मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये चौकशी करूनही अनेकांची ओळख पटत नाही. त्यावरून या व्यक्ती बेघर, भिकारी असल्याचे स्पष्ट होते. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात आढळून येणाऱ्या बेवारस मृतदेहांमध्ये देखील बेघरांचे प्रमाण अधिक आहे. पुलांखालील जागेत, पदपथांवर तसेच इतर आडोशाच्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. मात्र या व्यक्ती शहरात येतात कुठून याचा प्रशासनाला अद्याप प्रश्न पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बेघरांच्या वस्त्या देखील तयार झाल्या आहेत. त्यातच आजाराणे ग्रासल्याने उपचार अभावी देखील अनेकजण मृत पावत आहेत. काही दिवसांपूर्वीच जुईनगर येथील आरोग्य केंद्राबाहेर देखील एक बेघर व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली होती.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते २६ ऑक्टोबर दरम्यान १३४ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. तर गतवर्षी १५९ बेवारस मृतदेह आढळून आले होते. बेवारस मृतदेह आढळून आल्यानंतर त्याची ओळख पटेपर्यंत काही दिवस मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात ठेवला जातो. यामुळे देखील रुग्णालयांच्या शवगृहात मृतदेहांचा खच लागत आहे. तर शोध घेऊनही मृत व्यक्तीची ओळख न पटल्याच कायदेशी विल्हेवाट लावली जाते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत पोलिसांचाही चांगलाच कस निघतो.