नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा टप्पा असलेल्या पॅकेज-३ मधील ठाणे जिल्ह्यातील शीळफाटा ते पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेपर्यंतच्या झरोली हा १३५.४५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲन्ड टी कंपनीने जिंकले आहे. एल ॲन्ड टी कंपनीची १५,६९७ कोटींची निविदा एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड कार्पोरेशनने शुक्रवारी मंजूर केली. यामुळे या बांधकामांत या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत. ठाणे डेपाे वगळता हे काम आहे.
गेल्या आठवड्यात एनएचएसआरसीएलने देशातील समुद्राखालील ७ किलोमीटरच्या बोगद्यासह बीकेसी ते शीळफाटापर्यंतच्या २१ किलोमीटर भूमिगत मार्ग बांधण्याच्या ६३९७ कोटी रुपयांच्या कामासाठी ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्स सोबत करार केला. त्यानंतर राज्यातील सर्वात लांब असलेला १३५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲन्ड टी कंपनीने जिंकले आहे. या कामासाठी चार कंपन्यांत स्पर्धा होती. यात दिनेशचंद्र-डीएमआरसी जेव्ही, लार्सन अँड टुब्रो, ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्स-केपीटीएल आणि एनसीसी - जे कुमार यांचा समावेश होता. त्यात सर्वात कमी दराची १५,६९७ कोटींची निविदा भरणाऱ्या लार्सन अँड टुब्रोने बाजी जिंकली आहे.
पॅकेज ३ मध्ये या कामांचा आहे समावेश
महाराष्ट्र राज्यातील शीळफाटा आणि झरोली दरम्यान ठाणे, विरार आणि बोईसर या उन्नत स्थानकांसह १३५ किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्ट्स, पूल आणि माउंटन टनेलच्या सिव्हिल आणि बिल्डिंग कामांच्या डिझाइन आणि बांधकामाचा समावेश आहे. या मार्गात नद्यांवरील ११ पूल, डोंगरांखालील ६ बोगदे आणि इतर ३६ पुलांचा समावेश आहे. राज्यातील तुंगारेश्वर अभयारण्यासह पालघर जिल्ह्यातील पर्यावरणीयदृष्ट्या अनेक संवेदनशील भागातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे.बीकेसी भूमिगत स्थानकाचे काम सुरू
मुंबईतील बीकेसी येथील भूमिगत स्थानकाचे कंत्राट एमएईआयएल-एचसीसी कंपनीला देण्यात आहे. कंपनीची ३६८१ कोटींची निविदा मान्य केल्यानंतर या भूमिगत स्थानकाचे काम सुरू झाले आहे. ४.९ हेक्टरवर हे स्थानक बांधण्यात येत आहे. हे स्थानक तीन मजली असून यात फलाटांची लांबी ४१४ मीटर असून येथून १६ काेचची बुलेट ट्रेन ये-जा करू शकेल.
भिवंडी तालुक्यात असणार डेपो
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याच्या भारोडी आणि अंजूर गावाजवळील ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. बुलेट ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेल्या शिंकनसेन ट्रेन-सेटची देखभाल या ठिकाणी करण्यात येणार आहे. साबरमती डेपोनंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा डेपो असणार असून, आणखी एक डेपो सुरत येथे बांधण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदांना चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून येत्या साडेपाच वर्षांत या डेपोचे बांधकाम पूर्ण करण्याची अट आहे.महाराष्ट्राची पाच हजार कोटींची हिस्सेदारी
सत्तेवर येताच शिंदे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारचे शेअर खरेदीसाठी सहा कोटी रुपये वितरित केले आहेत. हा बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानला गेला. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच बुलेट ट्रेनचे शेअर अर्थात समभाग खरेदीची तयारी दर्शविली. या प्रकल्पात केंद्र सरकारची दहा हजार कोटी अर्थात ५० टक्के तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची प्रत्येकी २५ टक्के अर्थात पाच हजार कोटींची हिस्सेदारी आहे.
गुजरातमध्ये कामांनी जोर पकडला
गुजरात आणि दादरा आणि नगर हवेलीमधील ३५२ किमीच्या मार्गासह ८ उन्नत स्थानके आणि साबरमती येथील डेपोचे काम जोमात असून यातील काही कामे पूर्ण झाली असून काही प्रगतिपथावर आहेत. बुलेट ट्रेनच्या मार्गातील फक्त महाराष्ट्रातील कामे रखडली होती. मात्र, राज्यात गेल्या वर्षी सत्ताबदल होताच त्यांनी वेग पकडला आहे.