नवी मुंबई - महापालिका शाळेतील १४ विद्यार्थींचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी संगणक शिक्षकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक डोंबिवली येथे राहणारा असून तो डोंबिवली येथून महापे येथे महापालिका शाळेत एका एनजीओच्या वतीने संगणक शिकवण्यासाठी येत होता.नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात एका शाळेमध्ये खासगी कंपनी आणि सामाजिक संस्थेच्या (एनजीओ) वतीने संगणकवर्ग सुरू होते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जात होते. परंतु, शिक्षक त्याला दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना शिकवत नव्हता. १२ फेब्रुवारी रोजी दुसरी ते चौथी च्या विद्यार्थ्यांची सहल होती. त्या दिवशी आरोपीने सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले होते. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना बोलावल्याचे निदर्शनास येताच, मुख्याध्यापिकेने १३ फेब्रुवारीला प्रत्येक वर्गावर जाऊन अशाप्रकारे सुट्टीच्या दिवशी कोणीही बोलावले तरी शाळेत यायचे नाही, अशा सूचना दिल्या. यानंतर काही विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेस भेटून संगणक शिक्षक दोन महिन्यांपासून चुकीचे असभ्य वर्तन करत असल्याचे सांगितले.विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे निदर्शनास येताच मुख्याध्यापिकेने तत्काळ संबंधित सामाजिक संस्थेला याविषयी माहिती दिली. सामाजिक संस्थेने तुर्भे पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. विद्यार्थिनींशी चर्चा केली असता १४ मुलींनी विनयभंग झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी २५ फेब्रुवारीला आरोपीविरोधात भा. दं. वि कलम ३५४ आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिक्षक बनला हैवान! पालिका शाळेत केला १४ विद्यार्थिनींचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 3:59 AM
संगणक शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
ठळक मुद्दे डोंबिवली येथून महापे येथे महापालिका शाळेत एका एनजीओच्या वतीने संगणक शिकवण्यासाठी येत होता. विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे निदर्शनास येताच मुख्याध्यापिकेने तत्काळ संबंधित सामाजिक संस्थेला याविषयी माहिती दिली.