आत्तापर्यंतचे १४ मराठा मुख्यमंत्री त्या-त्या पक्षाचे चमचे - महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:55 AM2018-12-03T04:55:30+5:302018-12-03T04:55:43+5:30
महाराष्ट्रात आतापर्यंत १४ मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काहीही कार्यवाही केली नाही.
पनवेल : महाराष्ट्रात आतापर्यंत १४ मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काहीही कार्यवाही केली नाही. कारण ते त्या त्या पक्षाचे मालक नव्हते; तर चमचे होते, अशी टीका राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. नवीन पनवेल येथे राजपूत समाजातर्फे आयोजित महामोर्चात ते बोलत होते.
राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केल्यानंतर मी सर्वप्रथम समाजाला एकत्र केले. राजकारणाशिवाय समाजाची सुधारणा होणार नाही, असे सांगत धनगर समाजाला आरक्षण मिळणारच. त्याचबरोबर राजपूत समाजालाही न्याय दिला जाईल, अशी ग्वाही जानकार यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमाला १२ जिल्ह्यांतून राजपूत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संघटन वाढीसाठी प्रयत्न करा, दबाव तयार करा. तरच कुठलाही पक्ष तुमच्याकडे भीक मागत येईल. शिवाजी पार्क येथे पाच लाख राजपुतांचा मेळावा आयोजित करून तुमची ताकद दाखवून द्या, असा सल्ला जानकर यांनी दिला. ‘पद्मावत’ सिनेमादरम्यान राजपुतांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याविषयी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्र्याचे व सर्व घटकांना न्याय देणारे असल्याचे गौरवोद्गार जानकर यांनी काढले.