अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीकळंबोली वसाहतीलगत मुंब्रा महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. जवळपास एक कि.मी. लांबीच्या या प्रकल्पाच्या आड एकूण १४२ झाडे येत आहेत. त्यांच्या जागी एकास तीन झाडे लावण्याच्या अटीवर येथील वृक्ष तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार नव्याने ४२६ झाडे कंपनी लावणार आहे.कळंबोली स्टील मार्केटलगत ६१.३७ कोटी रुपये खर्च करून, हा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. टी अॅण्ड टी इन्फ्रा कंपनीला हे काम देण्यात आले असून, त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या मुदतीत काम पूर्ण करून, पूल वाहतुकीकरिता खुला करून देणे अपेक्षित आहे.कळंबोली गावातील काळभैैरव मंदिरापासून हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. पुलाची लांबी ११३० मीटर आहे. दोन्ही बाजूने मार्गिका असल्याने महामार्गाची रुंदीही वाढणार आहे. सद्या या ठिकाणी मध्यापासून २२ मीटर स्पॅनचे काम सुरू आहे. त्यामध्ये निलगिरी, सुबाभूळ, अन्य प्रजातीचे वृक्ष आहेत. हे वृक्ष तोडण्यासाठी टी अॅण्ड टी इन्फ्रा कंपनीने परवानगी घेतली आहे. या झाडांच्या बदल्यात दुसरीकडे झाडे लावण्याची अट रस्ते विकास महामंडळाने घातली आहे. सोमवारपासून स्टील मार्केटच्या बाजूकडील झाडे तोडण्यास सुरुवात झाली. ही झाडे पुनर्लागवड करण्यासारखी नसल्याने हा पर्याय अवलंबण्यात आला नसल्याचे ठेकेदार कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महामार्गावरील १४२ झाडांची कत्तल
By admin | Published: January 10, 2017 6:59 AM