पालिका कर्मचाऱ्यांना १४,४०० बोनस
By Admin | Published: October 20, 2015 11:50 PM2015-10-20T23:50:58+5:302015-10-20T23:50:58+5:30
महापालिकेमधील कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या कामगारांना स्थायी समितीने १४,४०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ठोक मानधन व रोजंदारीवरील कामगारांना ६,३०० रुपये
नवी मुंबई : महापालिकेमधील कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या कामगारांना स्थायी समितीने १४,४०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ठोक मानधन व रोजंदारीवरील कामगारांना ६,३०० रुपये दिले जाणार आहेत. सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला जाणार असून, अजून किती वाढ होणार याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान वेळेत देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. यावर्षी महागाई असल्यामुळे किमान २० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. स्थायी समिती बैठकीमध्ये प्रशासनाने सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. गतवर्षी कायम कामगारांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. ठोक मानधन व रोजंदारीवरील कामगारांना ५,९०० रुपये देण्यात आले होते. स्थायी समिती सदस्यांनी बोनसमध्ये वाढ करण्याची मागणी केली. अखेर कायम कामगारांना १४,४०० व कंत्राटी कामगारांना ६,३०० रुपये रक्कम निश्चित केली.
बोनसचा विषय अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. यावेळी बोनसच्या रकमेमध्ये नगरसेवक किती वाढ सुचविणार याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ मध्ये या कालावधीमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही बोनसची रक्कम मिळणार आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही ही रक्कम दिली जाणार आहे.