रायगडची १४५ वर्षांची पत्रकारितेची परंपरा
By admin | Published: January 6, 2016 01:09 AM2016-01-06T01:09:59+5:302016-01-06T01:09:59+5:30
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी १८४ वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ ला दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून वृत्तपत्र इतिहासाचा पाया रचला. त्यांच्या या क्र ांतिकारी कार्यामुळे ते मराठीतील आद्यसंपादक झाले.
जयंत धुळप , अलिबाग
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी १८४ वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ ला दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून वृत्तपत्र इतिहासाचा पाया रचला. त्यांच्या या क्र ांतिकारी कार्यामुळे ते मराठीतील आद्यसंपादक झाले. आद्य मराठी पत्रकार, आद्य समाजसुधारक आणि आद्य प्रपाठक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे ओळखले जातात. त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून, त्याची आठवण सर्वांना राहावी म्हणून दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस राज्यात ‘दर्पण दिन’ म्हणून पाळण्यात येतो. रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेची मुहूर्तमेढ देखील स्वातंत्र्यपूर्व काळात १८७० मध्ये रोवली गेली आणि रायगडच्या या पत्रकारिता परंपरेस यंदा तब्बल १४५ वर्षे होत आहेत, त्या अनुषंगाने घेतलेला वेध.
तत्कालीन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम अलिबागला १८७० मध्ये रावजी हरी आठवले यांनी ‘सत्यसदन’ नावाचे मराठी साप्ताहिक प्रकाशित करण्यास प्रारंभ करून जिल्ह्यातील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. मुरूडमध्ये ‘सिंधुयुग्म’ या दुसऱ्या मराठी साप्ताहिकाचा प्रारंभ मे १८७६ मध्ये झाला. अलिबागला ‘मेडिएटर’ नामक अँग्लो-मराठी पाक्षिक १८७७ मध्ये, ‘सत्धर्म-दीप’ हे मासिक १८७८, ‘अबलामित्र’ नावाचे मराठी मासिक १८७९ मध्ये सुरू झाले. १८८१ मध्ये ‘शरभ’ नावाचे साप्ताहिक निघत होते. १८८८ मध्ये नारायण मंडलिक यांनी (रामभाऊ मंडलिकांचे वडील) ‘सुधाकर’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले, मात्र १९१० मध्ये ते बंद झाले. १८९२ मध्ये फ्रामजी मेहता यांनी ‘माथेरान जॉटिंग्ज’ हे अर्धसाप्ताहिक सुरू केले. तेही १९१६ मध्ये बंद पडले. १८९४ मध्ये पेण येथून ‘पेण समाचार’, १९०६ मध्ये महाड येथून ‘ब्रम्होदय’, तर १९०८ मध्ये वैजनाथ (कर्जत) ‘कुलाबा’ हे साप्ताहिक विनायक दामोदर दिवेकर यांनी सुरू केले होते.
१९०८ मध्ये महाड येथून ‘राष्ट्रमुख,’ तर पेण येथून रामभाऊ मंडलिक यांचे ‘कुलाबा समाचार’ हे साप्ताहिक १९९१ मध्ये सुरू झाले. १९२० मध्ये ‘स्वराज्य’ साप्ताहिक, १९२१ मध्ये पेण येथून कुलाबा वृत्तपत्र तर ‘कुलाबा’ साप्ताहिक १९२४ मध्ये सुरू झाले होते. १९२५मध्ये ‘कुलाबा सदवृत्त’ हे साप्ताहिक, १९२७ मध्ये ‘कोकण’ हे साप्ताहिक, १९३५ मध्ये ‘राष्ट्रतेज’ हे साप्ताहिक, तर ‘कुलाबा युद्ध समिती’ ही वृत्तपत्रिका सुरू झाली. १९३८ मध्ये ‘कृषीवल’ पाक्षिक सुरू झाले आणि पुढे १९७७ पासून ते दैनिक झाले आहे. १९३८ मध्ये पनवेल येथून ‘आरोग्य मंदिर’, पेण येथून १९४८ मध्ये ‘जौहार’ हे नियतकालिक, तर पनवेल येथून ‘जनसेवा’ साप्ताहिक १९५० मध्ये सुरू झाले होते. दरम्यान ‘विधायक’ हे पाक्षिक अस्पृश्योद्धारासाठी सुरू केले होते, मात्र ते बंद झाले.
१९८७ मध्ये कृषीवल हे एकमेव दैनिक जिल्ह्यात होते. त्या वेळी कुलाबा समाचार, निर्धार, कोकण वैभव, किल्ले रायगड, जीवा-शिवा, प्रज्ञा, जिद्द, युगान्त, कुलाबा दर्पण, कुलाबा मानस, श्रीविद्या, दक्षिण युग, शिवतेज, झुंज, झुंजार शिक्षक, कर्नाळा, अवचितगड व ठिणगी ही साप्ताहिके प्रकाशित होत होती. मुंबईला खेटूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात मुंबईतून येणारी वृत्तपत्रे अधिक प्रमाणात वाचली जातात. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात वृत्तपत्रांचा विकास फारसा होऊ शकला नाही. मात्र अलीकडच्या काळात जिल्ह्यात स्थानिक दैनिकांची संख्या वाढली आहे.