महापेत एनटीटी डेटा ग्लोबलचे १४५६ कोटींचे डेटा सेंटर; १५,९४४ चौ. मी. क्षेत्रावर सहा इमारतींचे बांधकाम
By नारायण जाधव | Published: August 9, 2023 07:17 PM2023-08-09T19:17:18+5:302023-08-09T19:17:25+5:30
शेकडोंना मिळणार रोजगार
नवी मुंबई : देशातील डेटा सेंटर आणि आयटी क्षेत्रात ७५ टक्के वाटा नवी मुंबईचा असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली होती. त्यादृष्टीने नवी मुंबईची वाटचाल सुरू असून शहरात एकामागून एक डेटा सेंटर येत आहेत. यानुसार एनटीटी डेटा ग्लाेबल सेंटर्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चरर्स कंपनीच्या महापे येथील डेटा सेंटरला पर्यावरण विभागासह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच परवानगी दिली आहे. महापे येथील या डेटा सेंटरमध्ये कंपनी १४५६ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. नवी मुंबईत यापूर्वी मिलेनियम बिझनेस पार्कसह सिमेन्स, रिलायन्स, माईंडस्पेस, पटनी काॅम्प्युटरसह रिलायबल टेक पार्कने आयटी क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
असे असेल एनटीटीचे डेटा सेंटर
१ - एनटीटी डेटा ग्लाेबल सेंटर्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चरर्स कंपनीच्या महापे येथील प्रस्तावित डेटा सेंटर भूखंड क्रमांक ई २३४ आणि ई २३८ असे दोन भूखंड मिळून १५,९४४ चौरस मीटर क्षेत्रावर दोन ब्लॉकमध्ये असणार आहे. यातील ब्लाॅक ए मध्ये तळ मजला अधिक सात माळ्यांची एक आणि तळ मजला अधिक चार माळ्यांच्या दोन इमारतींना तर ब्लॉक बी तळ मजला अधिक पाच माळ्यांची एक, तळ मजला अधिक चार माळ्यांची एक आणि तळ मजला अधिक एक माळा अशा तीन इमारतींना परवानगी दिली आहे. याठिकाणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी चारचाकी १७६ आणि १८ दुचाकींची सोय केली आहे.
२ - या डेटा सेंटरला ६० मेगावॅट वीज लागणार आहे. आणीबाणीप्रसंगी वीज खंडित होऊ नये यासाठी २५०० किलो वॅटचे ५१ डीजी सेट बसविण्यात येणार आहेत. याशिवाय येथे दररोज सुमारे १६ क्युबिक मीटर पाणी लागणार, त्याच्या निचऱ्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीस ११ क्युबिक मीटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्यास सांगितले आहे. यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी परवानगी दिलेले डेटा सेंटर
यापूर्वी ग्रामरसी टेक पार्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस १४९५ कोटी रुपये गुंतवून एमआयडीसीच्या ऐरोलीतील भूखंड क्रमांक ७ व ७ ए वर डेटा सेंटरला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय गिगाप्लेक्स पार्कच्या विस्तारासही पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. दिघा येथील या पार्कमध्ये ही कंपनी २४६८ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
टीटीसी औद्योगिक वसाहतीचे महत्त्व
नवी मुुंबईतील टीटीसी औद्योगिक वसाहतीत मुबलक पाणी, रस्ते, रेल्वेचे जाळे आहे. मुंबई, ठाणे, पनवेल-उरण आणि कल्याण-डोंबिवली महानगरांना लागूनच ही वसाहत आहे. जेएनपीटी बंदरासह नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळच आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा शीव-पनवेल महामार्ग येथूनच जातो.