Navi Mumbai: १४८ शिल्पाकृतींनी घातली नवी मुंबईच्या सौंदर्यात भर
By नामदेव मोरे | Published: February 2, 2023 11:35 AM2023-02-02T11:35:58+5:302023-02-02T11:36:24+5:30
Navi Mumbai: स्वच्छता अभियानानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण कल्पना राबवत आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शिल्प तयार केली आहेत.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : स्वच्छता अभियानानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण कल्पना राबवत आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शिल्प तयार केली आहेत. १,७९० यंत्रभागांपासून नेरुळमध्ये उभारलेली फ्लेमिंगोची प्रतिकृती असो की सानपाडा येथील घोड्याची प्रतिकृती, ही शिल्पे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशा प्रकारची १४९ शिल्पे शहरांतील चौकांत उभारली असून ती शहर सौंदर्यात भर घालत आहेत.
महानगरपालिकने रिड्युस, रियूज व आणि रिसायकल या ‘थ्री आर’ वर लक्ष केंद्रित केले आहे. जुन्या टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. जुने कपडे, भांडी, चप्पल, बूट यांचाही योग्य वापर केला जात आहे. जुन्या वस्तू व यंत्र सामग्रीमधून टिकाऊ शिल्प तयार केली आहेत. ही शिल्प तयार करताना शहराची संस्कृती, प्रकल्पग्रस्तांचा सांस्कृतिक वारसा, आधुनिक शहराची संकल्पना डोळ्यासमोर ठेवूनही उभारली आहेत.
फ्लेमिंगोची प्रतिकृती वेधतेय लक्ष
नवी मुंबईचे आकर्षण स्थळ असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून २८.५ फूट इतक्या उंचीची भव्यता अशी फ्लेमिंगो शिल्पाकृती उभारली आहे. २६ वेगवेगळ्या यंत्रातील १,७९० टाकाऊ यंत्रभागांपासून ती साकारण्यात आली आहे. त्याचीही विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.
चरख्यासह चष्माही बनविला
महानगरपालिकेने यंत्रांच्या विविध वस्तूंपासून महात्मा गांधीजींचा चष्मा व चरखाही तयार केला आहे. महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी ही प्रतिकृती ठेवली आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्येही अशा प्रकारची शिल्पे बसविली आहेत.
मेडिटेशन करणाऱ्याचे शिल्प
n सानपाडा माेराज सर्कलजवळील घोड्याचे शिल्प, वाशी आसाम भवनजवळील मेडिटेशन करत असलेल्या नागरिकाचे शिल्पही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
n शहरात अशा प्रकारची तब्बल १४८ शिल्प उभारली आहेत. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सुशोभीकरणासाठी अशाप्रकारे विविध संकल्पना राबविल्या जात आहेत.
अपघातग्रस्त कारची प्रतिकृती
पामबीच रस्त्यावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे. अपघाताचे भीषण वास्तव नागरिकांना समजावे यासाठी नेरुळमधील आगरी कोळी चौकामध्ये अपघातग्रस्त कारची प्रतिकृती ठेवली आहे.