योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कोपरखैरणे व ऐरोली मलनिःसारण केंद्रांमध्ये प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट कार्यान्वित केले आहेत. येत्या काळात सदर प्रक्रियाकृत पाण्याच्या जास्तीत जास्त वापर औद्योगिक क्षेत्रात होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत होणार असून महानगरपालिकेस प्रक्रियाकृत पाणीविक्रीपासून पुढील वित्तीय वर्षात १५ कोटी रुपयांचे अर्थिक उत्पन्न अपेक्षित आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण २९ प्रकल्प प्रस्तावित आहेत. यापैकी मंजुरी प्राप्त झालेले ४ प्रकल्प हे पाणीपुरवठा विभागाशी संबंधित असून या कामांची प्रकल्प रक्कम ३३२.६० कोटी इतकी आहे. केंद्र शासन व राज्य शासनाकडून सदर कामांकरिता ७० टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामध्ये बेलापूर विभागाकरिता २४ तास पाणीपुरवठा यंत्रणा राबविणे व इतर अनुषंगिक कामे करणे, कोपरखैरणे १९ येथील धारण तलावाचे पुनरुज्जीवन करणे, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील होल्डिंग पाँड यांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याकरिता स्वयंचलित यंत्रणा राबविणे इत्यादी कामांचा समावेश आहे.