१५ कि.मी. अंतर केले दोन तासांत पार
By admin | Published: January 18, 2016 02:20 AM2016-01-18T02:20:31+5:302016-01-18T02:20:31+5:30
वाशी येथे राहणाऱ्या वेदांत विश्वनाथ सावंत (९) या विद्यार्थ्याने रविवारी सकाळी घारापुरी ते गेटवे आॅफ इंडिया हे १५ कि.मी.चे अंतर पोहून अवघ्या २ तास ५० मिनिटे
नवी मुंबई : वाशी येथे राहणाऱ्या वेदांत विश्वनाथ सावंत (९) या विद्यार्थ्याने रविवारी सकाळी घारापुरी ते गेटवे आॅफ इंडिया हे १५ कि.मी.चे अंतर पोहून अवघ्या २ तास ५० मिनिटे २८ सेकंदात पूर्ण केले. नवी मुंबईतील चिमुरड्याचा हा सागरी प्रवास पाहण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहन देण्यासाठी गेटवे आॅफ इंडिया येथे अनेक जलतरणपटू तसेच नागरिकांनी गर्दी केली होती.
वाशीतील फादर अॅग्नेल शाळेत शिकणाऱ्या वेदांतला अभ्यासाबरोबरच जलतरणाची आवड आहे. नियमित सराव, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनाने हे अंतर यशस्वीपणे पार करता आल्याचे तो सांगतो. महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या मान्यतेने आणि ओपन वॉटर सी स्वीमिंग क्लब आॅफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबईतील क्रीडापटूंना सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे यांनीही या स्थळी भेट देऊन वेदांतचे कौतुक करून अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक मिळवावा, असा सल्ला दिला. संपूर्ण प्रवासात न डगमगता वेदांतने आत्मविश्वासाने हे अंतर पार केले. संतोष पाटील (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक), तसेच संकेत सावंत(ए.एस.सी.ए. प्रशिक्षक) यांचे उत्तम प्रशिक्षण व कुशल मार्गदर्शनाखाली हा वेदांतने हा प्रवास उत्कृष्टरीत्या पार केल्या माहिती वेदांतच्या पालकांनी दिली. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेवक राजू शिंदे आदी मान्यवर मंडळी तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)