कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या सभेला जवळपास दीड लाख लोकांची उपस्थिती गृहीत धरून या ठिकाणी सभामंडप आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी कार्यक्रम स्थळाला भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला.
एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावा-शेवा सागरी सेतूचे यावेळी पंतप्रधान मोदी लोकार्पण करणार आहेत, तसेच याच वेळी महिला सशक्तीकरणाचाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
खारघर येथे झालेल्या सोहळ्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. विशेषत: वैद्यकीय सुविधांवर अधिक भर असून आरोग्य उपसंचालकांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थळावर सुविधांचा आढावा घेतला.
विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण
या दौऱ्यात एमटीएचएल या सागरी सेतूच्या लोकार्पणासहित एमएमआरडीएच्या इतर प्रकल्पांचेही लोकार्पण होणार आहे. तसेच नवी मुंबई मेट्रो, खारकोपर-उरण रेल्वे आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. तसेच रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे.
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन १२ जानेवारीला होत आहे. पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्यामुळे महामार्गावर उलवे परिसरामध्ये स्वच्छतेच्या कामांना वेग आला आहे. न्हावा शेवा शिवडी सागरी मार्ग, मेट्रो, दिघा स्टेशन व उरण रेल्वेमार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे बंदोबस्तासह सार्वजनिक सुविधा पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी विविध कामे सुरू केली आहेत. सायन-पनवेल महामार्ग, जेएनपीटी रोड, पनवेलकडून कार्यक्रम स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यासह उलवे नोडची साफसफाई केली जात आहे.
समन्वयक अधिकाऱ्यांवर कोणती जबाबदारी?
वैद्यकीय सुविधा - डॉ. प्रशांत जवादे यांच्य नियंत्रणाखालील टीमवर वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका पुरविणे व सर्वप्रकारची आरोग्याविषयी सुविधा देण्याची जबाबदारी दिली आहे.स्वच्छतेकडे लक्ष - रस्त्यांची साफसफाई करण्यासाठीची जबाबदारी घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखालील समितीकडे सोपविली आहे.परिवन सेवा - कार्यक्रमाच्या मार्गावर बसेस उपलब्ध करून देण्याची व त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन उपायुक्त योगेश कडूस्कर यांच्यावर सोपविली आहे.फिरते शौचालय - फिरते शौचालय पुरविणे, त्यांची स्वच्छता ठेवणे, संरक्षण युनिट, जेट मशीनची व्यवस्था करण्याची जबाबदारी उपायुक्त सोमनाथ पोटरे व श्रीराम पवार यांच्यावर सोपविली आहे.