महापालिकेचे १५ लाखांचे नुकसान
By admin | Published: November 12, 2016 06:43 AM2016-11-12T06:43:37+5:302016-11-12T06:43:37+5:30
सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम करताना एल अॅण्ड टीने परवानगी न घेता पदपथ खोदला आहे. १५ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाने संबंधितांना
नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम करताना एल अॅण्ड टीने परवानगी न घेता पदपथ खोदला आहे. १५ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाने संबंधितांना नोटीस पाठवली असून नुकसानभरपाई बरोबर गुन्हे दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. इमारतीचे बांधकाम करताना संजय जोशी चौकापासून उड्डाणपुलापर्यंत पदपथ ठेकेदाराने खोदला आहे. परवानगी न घेताच केबलसाठी चर तयार केले असल्याचे निदर्शनास आले आहे.
तीन वर्षे गैरसोय : रेल्वे स्टेशनच्या कामामुळे तीन वर्षांपासून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गत वर्षी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे सीवूड पश्चिम परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली. डेंग्यूमुळे एका तरूणाचा मृत्यूही झाला होता. उन्हाळ्यात धुळीच्या साम्राज्यामुळे रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. २०१३ पासून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. एल अॅण्ड टीमुळे नागरिक त्रस्त असताना प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.