एपीएमसीमधून 1500 किलो प्लास्टिक जप्त; प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:57 PM2019-01-24T22:57:34+5:302019-01-24T22:57:51+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लास्टिकचा वापर करणा-यांविरोधात मोहीम राबविली.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ व एपीएमसी प्रशासनाने प्लास्टिकचा वापर करणा-यांविरोधात मोहीम राबविली. दोन दिवसांमध्ये 1500 किलो प्लास्टिक जप्त केले असून, 35 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
नवी मुंबईमध्ये सर्वाधिक प्लास्टिकची विक्री व वापर बाजार समिती परिसरामध्ये होऊ लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी धाडी टाकून प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. महानगरपालिकेनेही यापूर्वी अनेक वेळा धाडी टाकून प्लास्टिकची विक्री करणा-यांवर कारवाई केली आहे. यानंतर दोन दिवस बाजार समिती व एमपीसीबीच्या अधिका-यांनी मसाला मार्केटमध्ये संयुक्त मोहीम राबविली. पहिल्या दिवशी 200 किलो व दुस-या दिवशी तब्बल 1300 किलोचा साठा हस्तगत केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी केतन पाटील, इंद्रजीत देशमुख, बाजार समितीचे किरण घोलप, सी. टी. पवार, आर. आर. गुरव यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.
बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्येही मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. या ठिकाणी परराज्यातून भाजीपाला विक्रीसाठी येतो. इतर राज्यांमध्ये बंदी नसल्याने तेथून प्लॅस्टिकमध्ये भरून कृषी माल विक्रीसाठी पाठविण्यात येतो. एमपीसीबीच्या पथकाने मार्केटमध्ये जनजागृती केली. माल पाठविणा-यांनाही प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
व्यापा-याने दिली चिल्लर
प्लास्टिक सापडलेल्या व्यापा-यांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रॉयल मसाला व ड्रायफ्रुट कंपनीच्या दुकानदाराने 5 हजार रुपयांची चिल्लर दंड स्वरूपात दिली. यामुळे कारवाई करणा-या पथकाला चिल्लर मोजण्यास खूप वेळ गेला. कारवाई करणा-यांना मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटाची आठवण झाली.