नवी मुंबई : मुंबई - दिल्ली कॉरिडॉरमधील मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवेच्या अंबरनाथ - बदलापूर सेक्शनच्या कामासाठी १,५७६ वृक्षांचा बळी जाणार आहे. यात ६०८ वृक्षांची पूर्ण कत्तल करावी लागणार असून, उर्वरित ९६८ वृक्षांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. याबाबतच्या नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या प्रस्तावाला राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच या वृक्षांची कत्तल करून मुंबई - वडोदरा एक्स्प्रेसवेच्या कामाला सुरुवात होणार आहे. यातील ज्या वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे त्यात ५ तर पुनर्रोपण कराव्या लागणाऱ्या वृक्षांत ५ अशा १० हेरिटेज वृक्षांचा समावेश आहे. या सर्व वृक्षांचे आयुष्यमान २६,४७१ वर्षे आहे. या बदल्यात नॅशनल हायवे ॲथॉरिटीने अंबरनाथ आणि कूळगाव नगर परिषदेकडून जागा घेऊन तेथे पर्यायी वृक्षारोपण करावे, असे निर्देश राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने दिले आहेत.
तळोजाच्या हिंदाल्कोत ४०० वृक्षांचा बळीनवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील हिंदाल्को कंपनीने आपल्या ॲल्युमिनियम प्लांटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३९६ वृक्षांची कत्तल करावी लागणार असून, ४१ वृक्षांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या वृक्षांचे आयुष्यमान ५,९८४ वर्षे आहे. या बदल्यात हिंदाल्को कंपनीने पनवेल तालुक्यातील पाले गावातील सर्व्हे क्रमांक १६, १७ आणि ३२ या वन विभागाच्या जागेवर सहा हजार वृक्षांचे रोपण करू, असे हमीपत्र दिले आहे. याबाबतच्या कंपनीच्या प्रस्तावाची छाननी माझी वसुंधरा संचालकांनी केली असल्याचे वृक्ष प्राधिकरणाने आपल्या तिसऱ्या बैठकीत म्हटले आहे.
ठाण्यात बुलेटमध्ये १७७ झाडांची कत्तलकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे महापालिका क्षेत्रात १७७ झाडांची कत्तल करावी लागणार असून, १,२१७ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. अशाप्रकारे प्रभावित होणाऱ्या १,३९४ झाडांच्या बदल्यात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन १८,०२७ वृक्षांचे रोपण करणार आहे. मात्र, त्यासाठी कार्पोरशनला सुयोग्य जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.