१६ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड; GST विभागाची कारवाई, व्यावसायिकाला अटक
By नारायण जाधव | Published: September 24, 2022 02:36 PM2022-09-24T14:36:32+5:302022-09-24T14:37:10+5:30
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे.
नारायण जाधव
नवी मुंबई : प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारच्या खरेदी विक्रीचा व्यवहार न करता तब्बल ८८. ८४ कोटींच्या बनावट खरेदी विक्रीच्या बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱया पुण्यातील मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स आणि सनराईज केमिकल्स या कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने छापा मारुन १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभागाने अधिक तपास करत सदर कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभागाच्या वतीने या आर्थिक वर्षात आतापर्यंत अशाच प्रकारच्या कारवाया करुन ४३ जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडुन बोगस बिलासंदर्भात विशेष तपासणी मोहीम सुरु असताना पुण्यातील मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स, सनराईज मिल मेल, सनराईज केमिकल्स या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे जीएसटी अन्वेषण विभागाकडुन या कंपनीच्या बोगस बिलासंदर्भात तसेच करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरू केली होती. या तपासणीत सदर कंपनीकडुन प्रत्यक्षात खरेदी विक्रीचा व्यवहार झाला नसल्याचे आढळून आले. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण पथकाने याबाबत केलेल्या सखोल तपासणीत सदर कंपनीने ८८. ८४ कोटीपेक्षा अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविल्याचे आढळले.
त्यानंतर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने मे.सनराईज टूर्स ऍण्ड ट्रव्हल्स, सनराईज मिल मेल, सनराईज केमिकल्स या कंपनीचे मालक हिरेन परेश पारेख यांना २३ सफ्टेंबर रोजी अटक केली. पारेख याला पुणे येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पुणे राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त श्रीकांत खाडे, ऋषीकेश अहिवळे, प्रदीप कुलकर्णी व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांच्या पथकाने पार पाडली.
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. कर चुकवेगिरी करणाऱयांना शोधुन काढण्यासाठी जीएसटी अन्वेषण विभागाकडून विशेष तपासणी मोहिम हाती घेण्यात येत आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून राज्य जीएसटी अन्वेषण विभागाने २०२२ या वर्षात कर चुकविगिरीच्या प्रकरणामध्ये एकुण ४३ जणांना अटक केली आहे. येत्या काळात जीएसटीमध्ये कर चुकवेगिरी करणाऱया तसेच इनपुट टॅक्स क्रेडिट बाबत फसवणुक करणाऱया विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पुणे राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे यांनी सांगितले.