नवी मुंबई : फेसबुकवरील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने सानपाडा येथील महिलेला १६ लाख ३० हजाराचा फटका बसला आहे. त्या व्यक्तीने तो युके मध्ये राहणारा असून त्यांना महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या कारणांनी भेटवस्तू मिळवण्यासाठी पैशाची मागणी करून त्यांची लुबाडणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सानपाडा येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेची फेसबुकवर ब्रायन वॉल्टर नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या व्यक्तीने तो डॉक्टर असल्याचे सांगून त्यांच्यासोबत बोलून बरं वाटत असल्याचे सांगून त्यांची सहानभूती मिळवली होती. यानंतर त्याने आपण युके मधून महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसात त्यांना दिल्लीमधून तसेच वेगवेगळ्या ठिकाणावरून बोलत असल्याच्या सांगणाऱ्या व्यक्तींनी फोन करण्यास सुरवात केली. त्यांनी या महिलेला युके मधून सोन्याचे शिक्के व पौंड भेट स्वरूपात आले असून ते सोडवण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार या महिलेने देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून एकूण १६ लाख ३० हजार रुपये त्यांना पाठवले. त्यानंतरही पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सानपाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.