पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाशांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:49 AM2021-03-15T03:49:42+5:302021-03-15T03:51:31+5:30
अखेर बेपत्ता बोटीचा ठावठिकाणा आणि सुखरूप किनारा गाठल्यानंतरच शोध मोहिमेला पूर्णविराम मिळाला. मात्र पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाश्यांचा जीव मात्र धोक्यात आला होता.
मधुकर ठाकूर -
उरण : पैसे वाचविण्यासाठी डिझेलऐवजी बाजारात बेकायदेशीरपणे विक्रीतील कमी दरात मिळणारे बायोडिझेल खरेदी केले आणि घात झाला. या बायोडिझेलमुुुळेच इंजीनमध्ये बिघाड झाला आणि खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघालेली ‘मास्टर ऑफ किंग्स’ मासेमारी नौका मुंबई बंदरापासून अरबी समुद्रात शेकडो सागरी मैलावर अचानक बंद पडली. संपर्क तुटल्याने पाच दिवस मासेमारी नौका अथांग अरबी समुद्रात भरकटत बेपत्ता झाली होती. अखेर बेपत्ता बोटीचा ठावठिकाणा आणि सुखरूप किनारा गाठल्यानंतरच शोध मोहिमेला पूर्णविराम मिळाला. मात्र पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाश्यांचा जीव मात्र धोक्यात आला होता. (16 sailors in danger for saving money)
उरण तालुक्यातील मुळेखंडपाडा येथील रितेश नाखवा यांची ‘मास्टर ऑफ किंग्स’ ही नौका २४ फेब्रुवारी रोजी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेली होती. या नौकेवर तांडेल दिनेश पालशेतकर, मालकाचा भाऊ मोरेश नाखवा यांच्यासह एकूण १६ खलाशी होते. मोरेश नाखवा यांनी प्रवासातील प्रत्यक्ष अनुभव कथन केला. १५ दिवसांच्या ट्रिपसाठी निघालेल्या नौकेत डिझेल, रेशन सामग्री, बर्फ, अन्य किरकोळ सामान असा एकूण २,३०,००० रुपयांचा माल भरण्यात आला होता.
खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघालेली बोट सलग तीन दिवस चालल्यानंतर एकदा रापण केली. त्यानंतर तीन दिवसांनी ती अचानक बंद पडली. नौकेवर असलेल्या वायरलेसवरून बोट बंद पडल्याचा संदेश पाठविण्यात आला. मात्र त्यानंतर बोटीचा संपर्क तुटला. संदेश मिळाल्यानंतर श्री दासभक्ती बोटीने सतत दोन दिवस शोध घेतला. मात्र ठावठिकाणा न लागल्याने दासभक्ती बोट माघारी फिरली.
मासेमारी बोटीतील इंजिनामधील बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले. पण, सागरी प्रवाहामुळे बोट एकाच जागी न थांबता सातत्याने इकडून तिकडे भरकटत जात होती. बोट नांगरून ठेवण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर बोटीला सोबत असलेले कापड, ताडपत्रीचा वापर करून शिड तयार करण्यात आले.
चार दिवसांत जवळपास ४५-५० नॉटिकल सागरी मैलाचा किनारा जवळ केला. दरम्यान, उरण परिसरातून मासेमारीसाठी जाणाऱ्या वैभव लक्ष्मी बोटीशी संपर्क झाला. बोटीवरील खलाशांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यांना आवश्यकतेनुसार खाद्यपदार्थ, रेशन दिले. तोपर्यत श्री दासभक्ती बोट पोहोचली होती. कोस्ट गार्ड, नेव्हीच्या बोटींना खात्री पटल्यावर श्री दासभक्ती बोटीकडे सुपुर्द करण्यात आली.
बायोडिझेलमुळेच झाला घात
- खरेदी केलेल्या कमी दराच्या बायोडिझेलमुळेच मासेमारी नौकेतील इंजीनमध्ये बिघाड झाला. फ्युएलपंप नादुरुस्त झाला आणि इंजीन बंद पडले. तो दुरुस्तीसाठी दीड लाख खर्च होणार आहे. त्यामुळे पाच लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
- समुद्राच्या डोंगराइतक्या उंचीच्या लाटांशी सामना करावा लागला. मात्र सुदैवाने खराब हवामान नसल्यानेच जीवावर बेतलेल्या या संकटातून १६ जणांची सुखरूप सुटका झाली आणि जीवावर बेतलेले संकटही दूर झाल्याची भावना मोरेश नाखवा यांनी व्यक्त केली.