- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल परिसरात अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. तसेच ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग केली जाते. त्याचा त्रास स्थानिकांना होत असून, वाहतूककोंडीचीही समस्या उद्भवत आहे. याशिवाय खासगी बसचालकांकडूनही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. गेल्या दहा महिन्यांत कळंबोली वाहतूक शाखेने नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांवर धडक मोहीम हाती घेतली. त्यांनी १६ हजारांपेक्षा जास्त अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामध्ये २३०० पेक्षा जास्त खासगी बसचा समावेश आहे. यांच्याकडून जवळपास ३० लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे आता कळंबोली परिसरातील अनेक रस्ते मोकळे दिसू लागले आहेत.
कळंबोली येथे सर्वात मोठी स्टील मार्केट आहे. मार्केटमधून लोखंड आणि पोलाद ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अजवड वाहने देशभरातून या ठिकाणी येतात. येथूनच २५ किलोमीटर अंतरावर जेएनपीटी आहे. त्या ठिकाणी दिवसभरात हजारो वाहनांची वर्दळ असून कळंबोली परिसरात ही वाहने मिळेल त्या जागी उभी केली जातात.
खरतर कळंबोलीमध्ये अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई आहे. तरीसुद्धा हाईट गेज तोडून ट्रक, ट्रेलर, टँकर अंतर्गत रस्त्यावर उभी केलेली दिसतात, तसेच मोकळ्या भूखंडावर वसुलीदादा अनधिकृत पार्किंग करत आहेत. मध्यंतर या विरोधात स्थानिक रहिवाशांनी आवाज उठवला होता. एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी अनेक वर्षांपासून याबाबत पाठपुरावा केला आहे.
कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी कठोर भूमिका घेत, बेकादेशीर पार्क केलेल्या, नियमांची पायमल्ली करणाºया अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार गेल्या ११ महिन्यांत १६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून जवळपास ३९ लाख ३३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाई करण्यात आलेल्या खासगी बसची संख्याही मोठी आहे. या मालकांकडून आणि चालकांकडून जवळपास पावणेसात लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कळंबोली वाहतूक पोलिसांच्या मोहिमेमुळे परिसरातील अनेक रस्ते अवजड वाहनमुक्त झाले आहे. अंतर्गत रस्त्यांबरोबरच राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.
कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने मार्च २०१९ पासून १६,१४२ इतक्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच सुरू ठेवणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनचालकांची गय केली जाणार आहे.- अंकुश खेडकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळंबोली वाहतूक शाखा