हापूससह बदामी लालबाग, तोतापुरीही दाखल; २० मार्चपासून बाजार समितीत आवक वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 07:12 IST2025-03-09T07:11:55+5:302025-03-09T07:12:02+5:30
२० मार्चपासून आवक मोठ्या प्रमाणात होणार

हापूससह बदामी लालबाग, तोतापुरीही दाखल; २० मार्चपासून बाजार समितीत आवक वाढणार
नवी मुंबई : फळांच्या राजाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. हापूससह बदामी, लालबाग, नीलम व तोतापुरी आंब्याचीही आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी ८६ टन आवक झाली असून, २० मार्चपासून आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १६ टन हापूस मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे. लहान आकाराचा हापूस होलसेल मार्केटमध्ये ५०० ते ६०० रुपये डझन व मोठ्या आकाराचा १,५०० ते १,६०० रुपये डझन दराने विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हापूस १ हजार ते २,५०० रुपये डझन दराने विकला जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व केरळ परिसरातून ७० टन हापूस, बदामी, लालबाग, नीलम, तोतापुरीची आवक झाली आहे.
या वर्षी खराब हवामानाचा फटका आंबा उत्पादनावर झाला असल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. कोकणातून २० मार्चपासून आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे. १ एप्रिल ते १० मेपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात राहणार असल्याची माहिती बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी दिली.
बाजार समितीत विशेष व्यवस्था
बाजार समितीमध्ये आंबा हंगामासाठी विशेष व्यवस्था केली आहे. आंब्याची वाहने विनाअडथळा मार्केटमध्ये यावी, यासाठी तीन नंबर गेट आरक्षित केले आहे. तर कलिंगडच्या वाहनांना दुपारी तीननंतर मार्केटमध्ये प्रवेश दिला जात आहे. आंबा हंगाम पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था कायम असणार आहे.