कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पनवेलजवळ मालगाडीला झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे रविवारी प्रवास सुरू होणाऱ्या विविध मार्गावरील १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असून जवळपास पंधरा गाड्या तीन तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या अनिश्चित कालावधीसाठी उशिराने धावत असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
शनिवारी दुपारी पनवेल आणि कळंबोली दरम्यान मध्य रेल्वेच्या मालगाडीचे डबे घसरल्याने याचा फटका कोकण रेल्वेच्या गाड्यांना बसला आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी विविध मार्गावर सुटणाऱ्या १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पाच गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तीन गाड्या अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या १५ गाड्या तीन तास उशिराने धावत आहेत. या अपघातामुळे पाच गाड्यांचा प्रवास अनिश्चित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी कळविले आहे. दरम्यान, काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर रोजीचा पूर्वनियोजित प्रवास रद्द केल्या काही गाड्या सुधारित वेळापत्रकानुसार २ ऑक्टोबर रोजी धावतील, असेही करंदीकर यांनी स्पष्ट केले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
पनवेल येथून ३० सप्टेंबर रोजी सुरू होणारा खेड मेमू विशेष प्रवास रद्द करण्यात आला आहे. तसेच दिवा - चिपळूण (०११५५) मेमू विशेष गाडी आणि लोकमान्य टिळक टर्मिनल - मंगळुरू जंक्शन (०११६५) गाडी रद्द करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर रोजी सुरू होणारा चिपळूण - दिवा (०११५६) मेमू विशेष प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पनवेल येथून रविवारी सुरू होणारा पनवेल - खेड (०७१०५) मेमू तसेच खेड -पनवेल ( ०७१०६) विशेष मेमूचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन ( १०१०३) या मांडोवी एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई सीएसएमटी - सांवतवाडी रोड ( ०११७१), मडगांव जंक्शन - मुंबई सीएसएमटी ( २०११२) कोकण कन्या एक्स्प्रेस, सावंतवाडी - दादर ( ११००४) तुतारी एक्स्प्रेस, सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी ( ०११७२), लोकमान्य टिळक टर्मिनल -मडगाव जंक्शन (११०९९), पनवेल - कुडाळ (०११८८), कुडाळ -पुणे (०११७०), मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक टर्मिनल ( १११००) एक्स्प्रेस, तसेच मंगळुरू जंक्शन - लोकमान्य टिळक (०११६६) या गाड्यांच्या १ ऑक्टोबर रोजीच्या फेऱ्या पुर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत.