महामुंबईतील सात मेट्रो मार्गांना १६६ कोटींचे बिनव्याजी दुय्यम कर्ज
By नारायण जाधव | Published: March 22, 2023 03:17 PM2023-03-22T15:17:52+5:302023-03-22T15:18:04+5:30
एमएमआरडीएलाच हे कर्ज वेळोवेळी देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रात मुंबई महानगर प्राधिकरणाकडून विविध मेट्रो मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. आता मार्च अखेर यातील सात मेट्रो मार्गांच्या कामांना आणखी वेग देण्यासाठी नगरविकास विभागाने बिनव्याजी दुय्यम कर्जाचा १६६ कोटींचा डोस मंगळवारी वितरित केला आहे. एमएमआरडीएलाच हे कर्ज वेळोवेळी देण्यात येत आहे.
यानुसार आता मेट्रो मार्ग २ अ अर्थात दहिसर-डीएननगरसाठी ३० कोटी, मेट्रो मार्ग २ ब अर्थात डीएननगर-मंडाळेसाठी २० कोटी, मेट्रो मार्ग क्रमांक ४ अर्थात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवलीसाठी ३२ कोटी, मेट्रो ५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याणसाठी १४ काेटी, मेट्रो क्रमांक ६ अर्थात स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळीसाठी १८ कोटी, मेट्रो मार्ग क्रमांक ६ अंधेरी-दहिसरसाठी ३८ कोटी आणि मेट्रो मार्ग क्रमांक ९ दहिसर-मीरा-भाईंदरसाठी १४ कोटी असे एकूण १६६ कोटी रुपये मंगळवारी वितरित केले आहेत.
मेट्रो प्रकल्पांचे बांधकाम सुरू असेपर्यंत हे दुय्यम बिनव्याजी कर्ज टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे.
मेट्रो मार्गांसाठी लागणारे केंद्रीय करांच्या ५० टक्के आणि स्थानिक करांच्या १०० टक्के मोबदला या कर्जाच्या माध्यमातून मदत म्हणून बिनव्याजी दुय्यम कर्जाद्वारेे एमएमआरडीएला देण्यात येत आहेत.