लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सायबर गुन्हेगारांनी सात महिन्यांत नवी मुंबईतून १६८ कोटी रुपये उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सायबर क्राईम पोर्टलवर ८०१० तक्रारी प्राप्त आहेत. देशभरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडत असून, नवी मुंबईतदेखील प्रतिदिन एक ते तीन व्यक्तींची फसवणूक होत आहे. त्यापैकी ८० कोटी ४७ लाखांच्या फसवणुकीचे २४९ गुन्हे नवी मुंबई सायबर पोलिसांकडे दाखल आहेत, असल्याची माहिती बुधवारी नवी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप चॅनेल व हेल्पलाईनचा शुभारंभप्रसंगी देण्यात आली.
- २४ तास हेल्पलाइन
ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने कार्यवाही गरजेची असते. त्यासाठी ८८२८११२११२ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे फसवणूक टाळण्यासाठी तसेच गुन्हा घडल्यास पुढील प्रक्रियेसाठी तातडीने हालचाली केल्या जातील, असे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.
- सात महिन्यांत ८० कोटी ४७ लाखांची रक्कम हडपली
चालू वर्षात सात महिन्यांत नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातून सायबर गुन्हेगारांनी ८०१० गुन्ह्यांतून १६८ कोटी रुपये हडपले आहेत. त्यापैकी २४९ तक्रारींचे गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये ८० कोटी ४७ लाखांची रक्कम हडपली आहे. चालू वर्षात १३ कोटी ६७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यावरून ऑनलाइन गुन्हेगारीचे गांभीर्य पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही वाशीतील पोलिसांच्या व्हॉट्सॲप चॅनेल व हेल्पलाईनच्या शुभारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त अमित काळे उपस्थित होते.