घणसोली गावातील मंदिरात १६८ तास अखंड हरिनाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:18 PM2019-08-24T23:18:12+5:302019-08-24T23:18:17+5:30
११७ वर्षांची परंपरा । ग्रामस्थांनी निर्माण केला ऐक्याचा आदर्श
नवी मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोलीमधील ग्रामस्थांनी दहीहंडी उत्सवाची ११७ वर्षांची परंपरा जपली आहे. हनुमान मंदिरामध्ये सलग १६८ तास भजन सादर करण्यात आले. ग्रामस्थांनी जुनी परंपरा जपून सर्वांसमोर ऐक्याचा नवीन आदर्श घालून दिला आहे.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये घणसोलीमधील स्वातंत्र्यसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिसरात सरोजिनी नायडू, दत्ताजी ताम्हणे व इतर अनेक स्वातंत्र्यसेनानींनी हजेरी लावली होती. नवी मुंबई महापालिकेची निर्मिती झाल्यानंतरही ग्रामस्थांनी गावातील जुन्या परंपरा व उत्सव सुरूच ठेवले असून त्यामध्ये गोकुळ अष्टमी महोत्सवाचाही समावेश आहे. १६ आॅगस्टला गावातील हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनामाला सुरुवात झाली. सलग १६८ तास मंदिरामध्ये भजन करण्यात आले.
गावातील कौलआळी, कोळीआळी, म्हात्रेआळी, चिंचआळी, नवघरआळी, पाटीलआळी या सहा प्रमुख आळीमधील नागरिक नियोजन करून २४ तास भजन म्हणत असतात. शुक्रवारी मध्यरात्री हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. पाटीलआळीच्या महिला भजनमंडळाने मंदिरामध्ये श्रीकृष्णजन्माचे पाळणागीत सादर केले. शानिवारी मानाची हंडी म्हात्रेआळीच्या मनीष म्हात्रे यांनी फोडली. गावामध्ये उंच दहीहंडी उभारण्यात येत नाही. १५ फुटांपर्यंतच हंडी उभारली जाते.
टाळ, मृदुंगाच्या गजरात सलग सात दिवस २४ तास भजन सादर करण्याची परंपरा देशात फक्त घणसोलीमध्ये सुरू आहे. ११७ वर्षे अखंडपणे ही परंपरा सुरू ठेवण्यात आली असून हा एक विक्रम समजला जात असुन ग्रामस्थांनी ऐक्याचा आदर्श कायम ठेवला आहे.
घरामध्ये सुरू झाला उत्सव
घणसोलीमधील शिनवार कमळ्या पाटील यांच्या घरामध्ये १९०२ मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. १९०६ पर्यंत त्यांच्याच घरात हा उत्सव सुरू होता. त्यानंतर ग्रामस्थांनी गावच्या मंदिरात तो उत्सव सुरू करून ती परंपरा कायम ठेवली आहे. शिनवार पाटील यांच्या चौथ्या पिढीतील भानुदास पाटील यांची मानाची दहीहंडी यावर्षी म्हात्रेआळी बाळगोपाळांनी फोडली.