भिवंडी दंगल प्रकरणातील १७ जणांची निर्दोष मुक्तता
By admin | Published: September 11, 2016 02:25 AM2016-09-11T02:25:14+5:302016-09-11T02:25:14+5:30
राज्यातील अनेक भागात पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडत असतांनाच दहा वर्षांपूर्वी भिवंडीत पोलीस चौकी पाडून टाकण्याच्या वादातून उसळलेल्या कोटरगेट दंगल प्रकरणातून १७ आरोपींची सबळ
ठाणे : राज्यातील अनेक भागात पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडत असतांनाच दहा वर्षांपूर्वी भिवंडीत पोलीस चौकी पाडून टाकण्याच्या वादातून उसळलेल्या कोटरगेट दंगल प्रकरणातून १७ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी अलीकडेच दिले आहेत. प्रक्षुब्ध जमावाने दोन पोलिसांची निर्घृण हत्या केली होती.
दंगलीत सहभाग असलेल्या या १७ जणांविरुध्द वेगवेगळ्या १४ कृ त्यांकरीता गुन्हे दाखल केले होते. यामध्ये अन्सारी अक्र म सोहेल, अन्सारी वसीम सोहेल, मोहमद रईस सल्लूउद्दीन अन्सारी, सुफीयान जमील कुरेशी, मोहमद आलम सौदागर अली अन्सारी, हसन अस्मान कुरेशी, जाफर इक्बाल अब्दुल जलील अन्सारी, सलीम शाह मोहमद मोमीन, अकील अब्दुल समद खान, नियाज अहमद रईस अहमद अन्सारी, मोहमद सलीम शफीक शेख, रिझवान अब्दुल सलीम उर्फ अलीम शेख, तौफीक अहमद समुद्दीन अन्सारी, आसीफ अब्दुल कलाम शेख, इक्बाल अहमद कुटूबूद्दीन अन्सारी, मोहमद अकील मोहमद शकील शेख, मोहमद शकील मोहमद शफीक शेख यांचा समावेश होता. मात्र सरकारी पक्षाला ते सिध्द करण्यात कमालीचे अपयश आल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. यामुळे दंगलीसारख्या अंत्यत गंभीर घटनेतही पुरावे गोळा करण्यात सरकारी पक्षाकडून कशी हगयग होते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.
रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या रमेश जगताप आणि बी. एस. गांगुर्डे या दोन पोलिसांवर सशस्त्र जमावाने हल्ला करुन त्यांची भर रस्त्यात हत्या केली. त्यानंतर या दोघांचे मृतदेह जाळून टाकण्यात आले होते. या दोघांच्या निर्घृण हत्येसंदर्भातील निकाल लागलेला नाही. मात्र ज्या पोलीस ठाण्याच्या उभारणीला विरोध करताना दंगल झाली त्यामधील आरोपी निर्दोष मुक्त झाले. अतिरिक्त सरकारी वकील दिलीप भाईराम यांनी न्यायालयात सांगितले की, ज्या ठिकाणी पोलीस स्थानक उभारण्याचे काम सुरु होते, तेथे शकील रझा यांच्या नेतृत्वाखाली रझा अकादमीचे कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी दगडफेक करुन हे काम बंद पाडले.(प्रतिनिधी)