नवी मुंबई : महापालिकेने शहरात कला व क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षभरामध्ये तब्बल १७ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये शालेयस्तर ते राज्यस्तरीय स्पर्धांचा समावेश असणार आहे. याशिवाय सात सांस्कृतिक उपक्रमही राबविले जाणार आहेत. राज्यातील एकमेव सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. सिडकोेने शहराची रचना करताना प्रत्येक नोडमध्ये शिक्षण व मैदानासाठी भूखंड राखीव ठेवले आहेत. याशिवाय कला व संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वच राज्यातील संस्थांना सांस्कृतिक भवनसाठी जागा दिली आहे. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र भवनही आहे. परंतु यानंतरही शहराला ठाणे व डोंबिवलीप्रमाणे सांस्कृतिक ओळख निर्माण होऊ शकली नाही. मैदाने असूनही चांगले खेळाडूही खूपच कमी घडले आहेत. यामुळेच शहराला सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी व चांगले खेळाडू तयार करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक महासभेमध्ये कला व क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. शूटिंग बॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणाऱ्या रेवप्पा गुरव यांना क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. (प्रतिनिधी)
महापालिका घेणार १७ क्रीडा स्पर्धा
By admin | Published: October 20, 2015 2:33 AM