गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ‘नैना’त सामान्यांसाठी १७१ घरे; २१ सप्टेंबर नोंदणी करा : सिडकोचे आवाहन
By कमलाकर कांबळे | Published: September 18, 2023 08:04 PM2023-09-18T20:04:05+5:302023-09-18T20:04:38+5:30
नैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआरनुसार ४००० चौ.मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ‘नैना’ क्षेत्रात सिडकोने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर १७१ घरे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १७, तर अल्प उत्पन्न गटांसाठी १६४ सदनिकांचा समावेश आहे. या घरांसाठी २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालवधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर ८ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
नैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआरनुसार ४००० चौ.मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २०% जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांच्या सदनिकांसाठी खासगी विकसकांना उपलब्ध केली आहे. या तरतुदीनुसार भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत सात विकसकांनी उपलब्ध सदनिकांची माहिती सिडकोस सादर केली आहे. योजनेअंतर्गत अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यासाठी ऑनलाइन नोंदणी २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन शुल्क भरणा २९ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहील. सोडतीकरिता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २ नोव्हेंबर रोजी, तर अंतिम ४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
या प्रक्रियेत सिडकोची जबाबदारी
सर्वसमावेशक योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिकांसाठी सोडत पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड करून ती यादी संबंधित विकसकास पाठविणे एवढीच जबाबदारी सिडकोची आहे. त्यानंतर सदनिकेची संपूर्ण रक्कम भरून घेणे, गृहकर्जासाठी यशस्वी अर्जदारांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे, अर्जदारासोबत सदनिकेचा करारनामा करणे, दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करारनाम्याची नोंदणी करणे, सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, अर्जदारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे आदींची सर्व जबाबादारी संबंधित विकसक पूर्ण करणार असल्याचे सिडकोने कळविले आहे.