आरोग्यासाठी १८ कोटी
By Admin | Published: January 9, 2016 02:17 AM2016-01-09T02:17:32+5:302016-01-09T02:17:32+5:30
ग्रामीण आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्याला १८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
आविष्कार देसाई, अलिबाग
ग्रामीण आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्याला १८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहरातील आरोग्य सेवांवरील ताण कमी करण्यासाठी पनवेल तालुक्यात नव्याने सात नागरी आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पाच नागरी आरोग्य केंद्रांची डागडुजीही होणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
आलेल्या निधीचे योग्य नियोजन करून जिल्ह्याच्या तळागाळात आरोग्य सुविधा पोचविण्याची जबाबदारी जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाला पेलावी लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर ११ कोटी ४४ लाख आणि जिल्हा रुग्णालयाच्या वाट्याला सहा कोटी ९७ लाख असे एकूण १८ कोटी ४२ लाख रुपये आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्याच गावामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत. विविध आजारांवर तातडीने उपचार मिळावेत, दैनंदिन लागणारी औषधे उपलब्ध व्हावीत. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्याची सेवा-सुविधा पुरविताना पुरती दमछाक होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला चांगलाच आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्हा परिषद अथवा जिल्हा सरकारी रुग्णालये यांना नियमित येणाऱ्या निधीव्यतिरिक्त राष्ट्रीय ग्रामीण योजनेचा अधिकचा निधी प्राप्त होत असल्याने या निधीच्या माध्यमातून आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यात यश येत आहे.
विकासाच्या वाटेवर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील शहरी आरोग्य सुविधेवर ताण अधिकच वाढत आहे. त्यामुळे नगरपालिका हद्दीमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारण्याला सरकारने मंजुरी दिली होती. त्यानुसार २०१५-१६ या कालावधीत एकट्या पनवेल तालुक्यात नव्याने सहा आणि खालापूर तालुक्यात एक नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.